
शिरूर : जिल्हा परिषद निवडणूकीच्या निमित्ताने तालुक्यातील वातावरण सध्या ढवळून निघाले आहे. मात्र सर्वाधिक चर्चा आहे ती रांजणगाव – कारेगाव जिल्हा परिषद गटाची. या गटात राजकारणात प्रभावी असणाऱ्या पाचुंदकर कुटुंबातील मानसिंग पाचुंदकर आणि शेखर पाचुंदकर हे दोन बंधू उमेदवारीसाठी चांगलेच सक्रिय झाले आहेत. मात्र या गटात उमेदवारीचा अंतिम निर्णय गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे घेणार असल्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे संपूर्ण गटाचे लक्ष लागून राहिले आहे.
एकीकडे राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी रस्सीखेच चालू असताना दुसरीकडे विरोधी गटात शांतता दिसून येत आहे. राष्ट्रवादीच्या प्रत्येक बारीक सारीक हालचालीवर हा गट लक्ष ठेवून आहे. मात्र विरोधी गटाची ही शांतता ‘वादळापूर्वीची शांतता’ आहे. राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर हा विरोधी गट सक्रीय होईल आणि तेवढ्याच ताकतीने लढत देईल असे सांगण्यात येत आहे. या गटाला कोणाची ‘रसद’ राहील हे ही आता लपून राहिलेले नाही.
पाचुंदकर बंधूंनी मात्र विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन चालवले आहे. मोठमोठे फ्लेक्स, क्रिकेट स्पर्धा, वाढदिवस, किर्तन यासारखे मोठमोठे कार्यक्रम घेऊन शक्तिप्रदर्शन दाखविले जात आहे. या कार्यक्रमांच्या निमित्ताने हजारोंची गर्दी जमविली जात आहे. या गटातील अनेक गावांमधून ग्रामस्थांना तसेच बचत गटांतील महिलांना तीर्थयात्रा घडवून आणल्या जात आहेत. या गटातील छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांचे वाढदिवसही मोठ्या दिमाखदारपणे साजरे केले जात आहेत या पाठीमागे निवडणुकीची किनार असल्याचे सांगण्यासाठी कुणा ज्योतिषाची गरज उरलेली नाही.
दुसरीकडे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते सोशल मीडियावर चांगलेच ‘अॅक्टिव्ह’ दिसत आहेत. आपल्याच नेत्याला कशी उमेदवारी मिळणार याबाबत वेगवेगळ्या पोस्ट टाकल्या जात आहेत. एकूणच सोशल मीडियावरही या बंधूंच्या उमेदवारीबाबत आडाखे बांधली जात आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीला अजून काही अवधी बाकी असला तरी मात्र या रांजणगाव- कारेगाव जिल्हा परिषद गटात राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे एवढे मात्र खरे.
from https://ift.tt/3xZelm5