शरीर आणि मनाचा असा काही संबंध आहे की जसं माय लेकराशिवाय राहु शकत नाही किंवा बाळ आजारी असेल तर आई वडील दुःखी असतात.त्या चिंतेने आईबापांची तब्येत आपोआप खालावते.असं दृश्य आपण अनुभवलं असेल पण मन आणि शरीराचा असाच संबंध आहे हे मात्र आपल्याला कळत नाही.आम्हाला सर्व गोष्टींचा आनंद घ्यायचा आहे पण…पण त्याला आमची कमाई कमी पडत आहे. 
त्यासाठी ओव्हरटाईम करणं क्रमप्राप्त आहे. मग आयुष्यभर मरमर कष्ट करुन जगणं म्हणजे जीवन आहे असं स्विकारुन जगणारा एक वर्ग आहे.कमावण्यापेक्षा गमावण्यावर विचार करणारा एक वर्ग आहे.कमावण्याची चिंता नाही गमवायचं कसं? यावर विचार करणारा एक वर्ग आहे.अवैध मार्गाने कसं कमावता येईल यावर विचार करणारा एक वर्ग आहे. या सर्व वर्गाचं मुळ शोधलं तर इच्छा एकच आहे आणि ती म्हणजे मला भौतिक सुखं मिळवायची आहेत.पण या सगळ्या प्रकारात मनाची अवस्था काय होते यावर विचार करायला वेळ कुणाकडे आहे?आणि विचार केलाच तर पर्याय काय आहे?
चंदनाच्या अंगी कितीही शितलता असली तरी त्याचा अग्नीशी संबंध आला की अग्नीरुपच होतो.तसंच संसारात आणि त्यातही प्रपंचात पडलेल्या व्यक्तीच्या व्यथा अशाच आहेत.गरीबीत गांजलेल्यांची आणि ऐश्वर्यात लोळणारांची दुःख सारखीच आहेत.ते पोट भरण्यासाठी पळतात आणि हे भरलेलं पचवण्यासाठी. हे सतत चालू रहाणार आहे. जगायचं कसं?हा प्रश्न पडल्याखेरीज जीवनशैली बदलणार नाही.
पैसा कमावण्याच्या नादात एक वेळचं जेवणही सोबत डबा असुन करता येत नसेल तर हे शहाणपणाचं आहे का?भुक लागल्यावर आणि वेळेवर न जेवल्याने काय काय होतं हे सांगण्याची गरज नाही. अरे हो भुक नेमकी कशाची लागली आहे हे तर आधी कळालं पाहिजे.कमावलेलं दवाखान्यातच घालणार हे गृहीत धरून चाललो आहोत आपण.धन कमावलच पाहिजे पण मनाविरुद्ध शरिराला कष्ट देऊन काहीच साध्य होणार नाही. मन आणि शरीराचा संबंध सुधृढ झाला तर हे नक्की कळेल की धावाधाव किती आणि कशी करावी? शरीरापेक्षाही त्याला चालवणारं मन सात्विक ठेवण्यासाठी सतत जागृत असायला हवं. त्याशिवाय सहज आणि सुंदर जीवन जगण्याची कला प्राप्त होत नाही.
रामकृष्णहरी

from Parner Darshan https://ift.tt/3ELRPz7

By News

Leave a Reply

Your email address will not be published.