चांगली आणि वाईट वृत्तीची माणसं म्हणजे समाज.एकच वृत्ती कुठेही पहायला मिळणार नाही. सत,त्रेता,द्वापार या तिनही युगाचा इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येते की कलियुगात आपण जे पहात आहोत तेच या तीनही युगात आहे. चांगल्या वाईट वृत्तीच्या माणसांची तेव्हाही कमी नव्हती.दोनही वृत्तीच्या मनुष्याला मृत्यू हा येतोच.पण मृत्यूनंतरही चर्चा होते,चांगल्याची चांगली आणि वाईटाची वाईट.म्हणजे केलेलं कर्म मृत्यूनंतरही शिल्लक रहातं असं म्हटलं तर चुकीचे होणार नाही.
पुढील पिढीला त्याचे कडुगोड चटके अनुभवावे लागतात,हा भाग फार वैचारिक प्रगल्भतेचा आहे.रावण खुपच गुणसंपन्न होता.रावणाचं मातृप्रेम सर्वश्रुत आहे.वाळुच्या पिंडीची पुजा करणाऱ्या आईला साक्षात भगवान शंकराचं आत्मलिंग आणण्यासाठी रावणानं केलेली साधना,शिवतांडव स्तोत्र त्यातुनच निर्माण झालं;जे विश्वामध्ये सर्वश्रेष्ठ समजले जाते.पण तरीही ज्ञानाचा अपव्यय झालाच ना?

सज्जनहो आपण कितीही ज्ञान प्राप्त केले आणि चित्तशुद्धीशिवाय जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर ते ज्ञान फलदायी ठरत नाही.
तुकोबाराय म्हणतात,
नाही निर्मळ जीवन काय करील साबण।तैशी चित्तशुद्धी नाही तेथे बोध करील काई।।
साबणाने बाह्यांगाने शुद्ध होता येईल. पण जीवनकर्मगती अशुद्ध असेल तर साबण ते धुवू शकेल का?तसं चित्त शुद्ध नसेल तर सत्य बोध होणारच नाही. चित्तशुद्धीशिवाय मिळवलेलं ज्ञान त्या धारदार सुऱ्या सारखं आहे.सुरा कुणाच्या हातात आहे यावर त्याचा वापर ठरतो.तो डॉक्टरांच्या हातात असेल जीव वाचतो आणि तो गुंडाच्या हातात असेल तर जीव जातो.
ज्ञान हे असच आहे ते कुणालाही प्राप्त करता येतं.ते कुंतीलाही प्राप्त होतं आणि गांधारीला सुद्धा.पण वापरासाठी चित्तवृत्ती महत्त्वाची ठरली.ज्ञान असुनही डोळ्यावर पट्टी बांधल्यावर वेगळं काय होणार?आपण पोकळ संदेश प्रसारित करताना कधीतरी हा ही संदेश प्रसारित केला असेल की,”समाज तुमच्या एका चुकीची वाट पहात आहे.”कोण आहे हा समाज?ती सगळी फालतु माणसं असतात.चांगली माणसं कुणाची चुक होण्याची वाट पहात नाही. पण चुक करण्याची संधी आपणच शोधत असलो तर?
या दोहोंच मिश्रण समाजात नित्य पहायला मिळतं.यातले आपण कोण?हे जगजाहीर सांगता आले नाही तरी ते जगजाहीरच असते.मी तसा नाही हे दाखवण्याचं सोंग करण्याची वेळ तेव्हाच येते जेव्हा आपण तसे नसतो.पण हा प्रयत्न म्हणजे स्वतःची केलेली फसवणूक आहे. आपण जे आहोत ते समाजात सिद्ध झालेलेच असते.
चित्तशुद्धी मनुष्याला वृत्तीपालटाकडे नेते.चित्तशुद्धीचा प्रयत्न करणं म्हणजेच ते शुद्ध नाही हे मान्य करावं लागेल.सत्कर्म चित्तशुद्धीशिवाय घडतच नाही.महाराज म्हणतात, चित्त समाधान। तरी विष वाटे सोने।। आनंदी जगण्याचा ठेवा चित्तवृत्तीशी निगडित आहे म्हणून चित्ती असु द्यावे समाधान हे सांगण्याचं कारण तेच आहे.
समाधान सर्वांनी मिळवावं म्हणून अगदी दंडवत घालून ते म्हणतात,

सकळांचे पायी माझे दंडवत।आपुलाले चित्त शुद्ध करा।। ज्ञानी मनुष्याने चित्तशुद्धीकडे विषेश लक्ष द्यायला हवे.त्याशिवाय मिळवलेल्या ज्ञानाचा ना दुसऱ्याला लाभ होईल ना स्वतःला त्याचा आनंद घेता येईल.तुका म्हणे एका मरणे चि सरें। उत्तम चि उरें किर्ती मागे।। सुकिर्तीनेच मरण यावे हिच जीवनाची सार्थकता आहे. मी या वाटेवरचा पांथस्थ आहे. थोडं जरी जमलं तरी आनंद आभाळभर आहे.
रामकृष्णहरी

from Parner Darshan https://ift.tt/3nbnXX9

By News

Leave a Reply

Your email address will not be published.