
नवी दिल्ली : आठवडाभरापूर्वी कुन्नूर येथील हेलिकॉप्टर अपघातात गंभीर जखमी झालेले हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचे बुधवारी बंगळुरूतील लष्करी रुग्णालयात निधन झाले. देशाचे पहिले संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि सशस्त्र दलांचे ११ कर्मचारी यापूर्वी हेलिकॉप्टर अपघातात मरण पावले होते.
‘८ डिसेंबरला अपघातात गंभीर जखमी झालेले आमचे ‘धाडसी’ ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचे निधन झाल्याचे कळवताना भारतीय हवाई दलाला अतीव दु:ख होत आहे. हवाई दल आदरांजली व्यक्त करते, तसेच सिंह यांच्या कुटुंबीयांबाबत संवेदना व्यक्त करते’’, असे भारतीय हवाई दलाने ट्विटरवर लिहिले.
गेल्या वर्षी ऑक्टोरबमध्ये वरुण सिंह हे तेजस विमानाचे उड्डाण करत असताना त्यात तांत्रिक बिघाड झाल्यानंतर त्यांनी असामान्य कौशल्य व धैर्य दाखवले होते. त्याबद्दल त्यांना देशाचा शांततेच्या काळातील तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार असलेले ‘शौर्य चक्र’ गेल्या ऑगस्टमध्ये देऊन गौरवण्यात आले होते.
उत्कृष्ट चाचणी वैमानिक म्हणून ओळखले जाणारे ३९ वर्षांचे सिंह यांच्या पश्चात पत्नी, ११ वर्षांचा मुलगा आणि ८ वर्षांची मुलगी असे कुटुंब आहे. त्यांचे वडील कर्नल (सेवानिवृत्त) के.पी. सिंह यांनी आर्मी एअर डिफेन्समध्ये सेवा दिली होती. सिंह कुटुंबीय मूळचे उत्तरप्रदेशातील गाझीपूरचे असून ते सध्या भोपाळमध्ये राहतात.
एमआय-१७ व्ही५ हेलिकॉप्टर अपघातात भाजल्याने गंभीर जखमी झालेले वरुण यांना गेल्या बुधवारी तमिळनाडूतील वेलिंग्टनच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी त्यांना तेथून बंगळुरूच्या कमांड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते.
राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्र्यांकडून आदरांजली
ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांना आदरांजली वाहिली.
‘ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांनी देशाभिमान, शौर्य आणि संपूर्ण व्यावसायिकतेने देशाची सेवा केली. त्यांच्या निधनामुळे मला अतीव दु:ख झाले आहे. त्यांनी केलेली देशाची अत्युच्च सेवा कधीच विसरता येणार नाही. त्यांचे कुटुंबीय आणि मित्र यांच्याप्रति मी शोकसंवेदना व्यक्त करतो’, असे ट्वीट पंतप्रधान मोदी यांनी केले.
‘जीवनासाठी झुंजार लढा दिलेले ग्रूप कॅप्टन वरुण सिंह यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे वृत्त कळून दु:ख झाले. हेलिकॉप्टर अफघातात गंभीर जखमी होऊनही त्यांनी सैनिकाचे शौर्य व दुर्दम्य धैर्य या भावनांचा परिचय दिला. देश त्यांच्याबद्दल कृतज्ञ आहे. माझ्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत’, अशा शब्दांत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सिंह यांना श्रद्धांजली वाहिली.
‘हवाई दलाचे वैमानिक, ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांच्या निधनाच्या बातमीने मला शब्दातीत दु:ख झाले. ते सच्चे लढवय्ये होते आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढले. त्यांचे कुटुंब व मित्रपरिवार यांच्याप्रति मी शोकसंवेदना व्यक्त करतो. या दु:खाच्या काळात आम्ही दृढपणे त्यांच्या कुटुंबासोबत आहोत’, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
from https://ift.tt/3q3HwR4