
जीवनात कितीही दुःख आलं तरी ते भोगाव तर लागतच.पण खरा आटापिटा असतो तो हा,की जगापासून लपवत भोग भोगण्याचा प्रयत्न. हे केविलवाणे आहे. बाभळीच्या बिया पेरल्यावर .त्याला भविष्यात बदाम येतील या आशेवर जीवन आनंदी जगता येणार नाही.झालेल्या कर्माचं प्रारब्ध होऊन येणारच आहे.
जे संचित म्हणजे साठलय ते पुढे येणारच आहे.आलेल्या स्थितीचं प्रक्षालन करता येतं का?ते टाळता येईल का?भौतिक अंगानं ते अशक्यच आहे. पण कालौघात पुन्हा पुर्ववत होणे मात्र निश्चित संभव आहे.
नाथबाबा म्हणतात, जैशी स्थिती आहे तैशा परी राहे।कौतुक तु पाहे संचिताचे।।
एका जनार्दनीं भोग प्रारब्धाचा।हरीकृपे त्याचा नाश झाला।।
पहिल्यांदा हे मान्य केले पाहिजे की आज आपल्याला जी स्थिती प्राप्त झाली आहे ती आपोआप झालेली नाही. मग ती स्थिती चांगली असेल किंवा वाईट असेल.ते संचिताचे फळ आहे. आणि ते कौतुकाने भोगण्याची मनस्वी तयारी केली पाहिजे. स्थिती वाईट असेल,आणि अनुताप झाला तर मात्र तो भोगही हसत हसत संपवण्याचं बळ प्राप्त होतं.यालाच हरीकृपा म्हटलेलं आहे.हरीकृपा निच कर्म करुन कशी प्राप्त होणार?
त्यासाठी अनुताप होणं गरजेचं आहे.शिवाय पुढे उच्च कर्म घडणेही अपेक्षित आहे.विद्युत प्रवाह सुरू असलेल्या तारेला हात लागला आणि झटका बसला की मग कुणी कितीही आग्रह केला तरी ती चुक पुन्हा होत नाही. अनुताप असा आहे. पुन्हा चुका होणार नाहीत याची मनोमन दक्षता घेतली जाते.त्यामुळे प्रारब्धाची तिव्रता कमी होत जाते.हरिप्रिय जीवन जगता आले तर अशक्य काहीच नाही. त्याच्या कृपेला प्राप्त होणं म्हणजे त्याच्या साक्षीने प्रपंच करणे आहे. तो प्रपंचात आला की मग दुःख संपते.होता त्याची भेटी दुःख कैचे। ही स्थिती क्षणात मिळणार नित्य संतसहवासाने त्याची फलनिष्पत्ती आहे.संत चरण रज लागता सहज।वासनेचे बीज जळोनिया जाये।।अंधार गेला की शिल्लक रहातो तो प्रकाश.पण अंधाराला घालवावं लागत नाही..
ज्याक्षणी दिवा पेटवला त्याक्षणी अंधार गेला.संतसहवास असा आहे. त्यांच्या असण्याने वासना पळुन जातात. आपण हा सतत प्रयत्न केला पाहिजे. कारण चुकला नाही असा मनुष्य या भुतलावर नाही.
रामकृष्णहरी
from https://ift.tt/3GJNHAG