
पारनेर : करुणा मुंडे यांनी सोशल मीडियावर नुकताच नव्याने एक व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओमध्ये त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. तसेच मी पुन्हा बीडला जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या बरोबरच त्यांनी या व्हिडिओमध्ये पारनेरचे आमदार निलेश लंके यांचे तोंडभरून कौतुक केले असून त्यांना मंत्री करा, अशी मागणी केली आहे. दरम्यान् आ.लंके व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची जवळीक असल्याने या व्हिडिओची पारनेर तालुक्यात मात्र चांगलीच चर्चा रंगली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खूप चांगले लोक आहेत निलेश लंके सारख्या माणसाचं खूप चांगलं काम आहे. अशा लोकांना तुम्ही मंत्री करा. कोरोनाच्या काळात घरातील लोक एकमेकांना विचारत नव्हते परंतु निलेश लंके सारखा माणूस कोरोना काळात कोरोना झालेल्या व्यक्तीसोबत होते, असे करुणा मुंडे यांनी म्हटले आहे.
निलेश लंके यांना मी नमस्कार करते. त्यांचे राहणीमान किती साधे आहे. त्यांच्या बायकोची मुलाखत मी पाहिली होती, किती साधे लोक आहेत ते अशा लोकांना संधी द्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गप्प बसून आहेत. सध्याचे सरकार महिला विरोधी आहे का असा सवालही त्यांनी या व्हिडीओ मध्ये केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि सुप्रियाताई सुळे यांना उद्देशून करुणा मुंडे यांनी म्हटले आहे की , राष्ट्रवादी पक्षात खूप चांगले लोक आहेत परंतू काही लोकांमुळे पक्ष बदनाम होत आहे त्यामुळे तुम्ही लक्ष दिले पाहिजे.
माझी आणि समोरच्या व्यक्तीची ही नार्को टेस्ट करा. सत्य काय ते समोर येईल, असे त्यांनी म्हटले आहे.
याबाबत आमदार निलेश लंके यांच्या निकटच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता आमदार लंके यांनी हा व्हिडिओ पाहिला नाही, असे सांगून यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले.
करुणा मुंडेचा हा व्हिडिओ सध्या पारनेर तालुक्यात चांगलाच व्हायरल होत असून त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
from Parner Darshan https://ift.tt/3mZO2bC