
देविदास आबूज
पारनेर : गतवर्षीपेक्षाही यंदाची दिवाळी ही जरा वेगळीच आहे. तेजाचा समजला जाणारा हा सण कोरोनाच्या मळभाखाली गेली दीड -दोन वर्ष झाकोळून गेलेला आहे. हळुहळू परिस्थिती पूर्वपदावर येवू लागल्याने लॉकडाऊन आता अनलॉक झाले असले तरी हे संकट मात्र टळलेले नाही. लक्ष लक्ष दिव्यांनी आसमंत उजळून जातो मात्र, या संकटामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत म्हणजेच या वर्षात अनेक घरातील दिवे विझून गेले आहेत.उत्सवाच्या काळात हे विसरून चालणार नाही. एक दिवा त्यांच्यासाठी प्रज्वलित करून त्यांची आठवण ठेवावी लागेल.
दिवाळीच्या सणाला हजारो वर्षांची परंपरा आहे. सणांचा राजा समजल्या जाणाऱ्या दिवाळीच्या सणाला पुराणातही महत्त्व आहे. दीपोत्सवाचा संबंध देवादिकांची जोडला जातो. पाच दिवस चालणाऱ्या या सणात राम ,कृष्ण, लक्ष्मी,यम, हनुमान अशा हिंदु धर्म संस्कृतीतील देवतांचे पूजन करण्यात येते.सर्व जाती, धर्म विविध प्रांतात साजरा होणारा हा सण इतर सणांपेक्षा वेगळा आहे.
सध्या शासनाने काही निर्बंध कमी केले असले असल्याने बाजारपेठा दिवाळीच्या खरेदीसाठी गर्दीने फुलून गेल्या आहेत. खरेदीसाठी जथ्थेच्या जथ्थे बाहेर पडताहेत. एकीकडे होणारी गर्दी आणि दुसरीकडे सुरू असलेली थंडीची लाट, प्रदूषण यामुळे कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.आरोग्य यंत्रणांनीही राज्यातील नागरिकांना आवाहन करीत खबरदारी घेऊन हा सण घरातच साधेपणाने साजरा करण्याची तसेच खबरदारी घेण्याचे सांगितले आहे. या उत्सव काळात योग्य ती काळजी घ्यावी लागेल अन्यथा पुन्हा घरातच बसण्याची वेळ देखील येऊ शकते अशी शक्यताही वर्तविली आहे.
दिवाळीचा आनंदाचा सण साजरा करताना संकट अद्याप गेलेले नाही याचे भान ठेवावे लागेल. गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेले लघुउद्योग आत्ताशी कसेबसे सुरू झालेत. उद्योग व्यवसायच अनेक महिने बंद असल्याने दुकानाचे भाडे व कर्जाचे हप्ते भरण्यास महाग असणाऱ्या अनेक कुटुंबांची दिवाळी कशी साजरी होणार? हा देखील प्रश्नच आहे. त्यांना देखील उत्सव काळात यथाशक्ती मदत करणे हे कर्तव्य विसरून चालणार नाही. तिमिरातून तेजाकडे नेणाऱ्या या सणावर कोरोनाच्या अंध:काराचे सावट आहे परंतु याही परिस्थितीत शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत सुरक्षितता, खबरदारी घेत हे संकट दूर व्हावे, इडा पिडा टळो अशी प्रार्थना करीत आशेचा किरण शोधायलाच हवा एवढीच अपेक्षा. सर्वांना ‘पारनेर दर्शन’ परीवाराच्या वतीने दिपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.. !
from Parner Darshan https://ift.tt/3BK1ELZ