जामखेड : येथील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पारनेर बाजार समितीच्या कारभाराचा दाखला देत प्रशांत गायकवाडांचे कौतुक करत सर्व सामान्य शेतकऱ्यांना जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करा व जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी लक्ष घालण्याच्या सूचना केली.
जामखेड येथे आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकासा कामांचे भूमिपूजन अजित पवार व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अजित पवार बोलत होते. या वेळी आमदार रोहित पवार, आमदार निलेश लंके,आमदार संग्राम जगताप,जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कर्जत-जामखेड ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यभूमी आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी मी येथील मतदारांना साथ देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार येथून तीन जिल्हा परिषद सदस्य निवडून दिले. त्यामुळे या भागाला जिल्हा परिषद अध्यक्षपदही दिले होते. रोहित पवारांना निवडून दिल्यापासून त्यांनीही विकास निधी आणून कामे सुरू केली आहेत.
जिल्हा बँकेचा कारभार चेअरमन उदय शेळके यांच्या नेतृत्वाखाली उत्तम सुरू आहे मात्र काही विरोधी संचालकांकडून शेतकऱ्यांची अडवणुक होत असल्याच्या तक्रारी आहेत. या तक्रारीचा धागा पकडून पारनेर तालुक्यातील जिल्हा बँक संचालक प्रशांत गायकवाड यांना उद्देशुन अजित पवार म्हणाले की, प्रशांत तुम्ही एकट्या पारनेरचे संचालक नसून संपूर्ण जिल्ह्याचे संचालक आहात त्यामुळे जामखेडला विशेष लक्ष ठेवा त्यासंबंधी चेअरमन उदय शेळके यांच्याशी मी बोलतो असे सांगत पारनेर बाजार समितीत प्रशांत गायकवाड यांनी केलेल्या कामांचे कौतुक करत जामखेड,कर्जत बाजार समितीच्या येणाऱ्या निवडणुकीत काम करणाऱ्या लोकांच्या हाती बाजार समिती द्या असे आवाहन या वेळी केले.
अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्याही साखर कारखान्याने दिला नाही एवढा २,८०० रुपये प्रतीटन एफआरपी भाव अंबालिका साखर कारखाना देत आहे. करायचे असेल तर समाजाच्या भल्यासाठी काम करा. काही साखर कारखान्यांनी तर मागील दोन हंगामांचे एफआरपीचे पैसे शेतकऱ्यांना दिलेले नाहीत, असा टोलाही अजित पवारांनी नाव न घेतात भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांना लगावला.

from Parner Darshan https://ift.tt/3DeQ1yp

By News

Leave a Reply

Your email address will not be published.