
आयपीएल 2022 साठी 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे लिलाव प्रक्रिया होणार आहे. यामध्ये एकूण 590 खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. मात्र हा लिलाव होणार कसा? याबद्दल आज जाणून घेऊयात..
खेळाडूंचा लिलाव होतो म्हणजे नक्की काय होते? : हा एक खुला लिलाव असतो. यात एखादा खेळाडू कोणत्या संघाकडून खेळणार? हे ठरवले जाते. यामध्ये सर्व संघ भाग घेऊन खेळाडूंना खरेदी करतात. मात्र त्यासाठी बोली लावली जाते. जो अधिक रक्कम बोलले तो त्या खेळाडूला आपल्या संघाकडून विकत घेतो. लिलावासाठी येणारे संघ संपूर्ण तयारीनिशी येतात. ज्या खेळाडूंना खरेदी करायचे त्यांची यादी त्यांच्याकडे ए,बी,सी,डी या क्रमाने असते. त्यानुसार खेळाडूंची खरेदी होते.
खेळाडूंचे वाटप कसे होते? : खेळाडूंना इंडियन कॅप्ड, इंडियन अनकॅप्ड आणि परदेशी खेळाडू अशा तीन श्रेणींमध्ये विभागले गेले आहे. यानंतर खेळाडूंना गोलंदाज, वेगवान गोलंदाज, फिरकी गोलंदाज, अष्टपैलू आणि यष्टीरक्षक अशा वैशिष्ट्यांच्या आधारे वेगवेगळ्या गटांमध्ये ठेवले जाते. जर एखाद्या खेळाडूने अद्याप देशासाठी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नसेल तर त्याला अनकॅप्ड खेळाडू असे म्हणतात.
लिलाव कसा होतो? : लिलावादरम्यान, लिलावकर्ता खेळाडूच्या नावाची घोषणा करतो. लिलावकर्ता खेळाडूंची सर्वमाहिती देतो. त्यानंतर संघ खेळाडूच्या बेस प्राईजनुसार (आधारभूत किंमत) बोली लावतात. समजा एखाद्या खेळाडूची मूळ किंमत 1 कोटी असेल तर त्याची पहिली बोली 1 कोटींपासून सुरू होईल. यानंतर, इतर संघांच्या बोलीमुळे त्याची किंमत वाढते. असे असले तरी कोणत्याही खेळाडूला त्याच्या मूळ किमतीपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येत नाही. जेव्हा एखाद्या खेळाडूसाठी सर्वाधिक बोली लागते, तेव्हा लिलावकर्ता सर्व संघांना शेवटच्या बोलीबद्दल तीन वेळा आठवण करून देतो आणि कोणत्याही संघाने रस दाखविला नाही तर त्या खेळाडूची लिलाव प्रक्रिया पूर्ण होते.
खेळाडूंना नक्की किती पैसे मिळतात? जर एखाद्या खेळाडूला 3 वर्षांच्या करारावर 10 कोटी रुपयांना विकत घेतले असेल, तर त्याला दरवर्षी 10 कोटी रुपये मिळण्याचा हक्क आहे. एखादा खेळाडू संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध असल्यास, त्याने कितीही सामने खेळले तरी त्याला पूर्ण रक्कम मिळते. मात्र हंगाम सुरू होण्यापूर्वी एखादा खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडला तर त्याला कोणतेही पैसे दिले जात नाही. एखादा खेळाडू संपूर्ण हंगामाऐवजी काही सामन्यांसाठी उपलब्ध असेल तर त्याला उपलब्धतेच्या आधारावर 10 टक्के रिटेनरशिप फी दिली जाते.
from https://ift.tt/6zDyh9L