
कर्जत :आमदार निलेश लंके व रोहित पवार यांना मंत्रिपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा सध्या नगर जिल्ह्यात सुरू आहे यावर उपहासात्मकपणे बोलताना खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, जिल्ह्यात दोन नाही तर सहा मंत्रीपदे देऊन अहमदनगर जिल्ह्याला राज्याची राजधानी घोषित करावी. गरज पडली तर नगरमध्ये एखादे मंत्रालय देखील बांधता येईल, असा खोचक टोलाही खासदार विखे यांनी लगावला.
नगर जिल्ह्यातील चार नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यात कर्जत नगर पंचायतचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी भाजपने सोमवारी कर्जतमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके व रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली.
कर्जत नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजप व मित्रपक्षांतर्फे मोठे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले या वेळी झालेल्या जाहीर सभा झाली. या प्रसंगी भाजपचे माजी मंत्री राम शिंदे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, युवा नेते सुवेंद्र गांधी, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, सरचिटणीस सचिन पोटरे, सह निरीक्षक बाळासाहेब महाडिक, जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर, तालुकाध्यक्ष डॉ सुनील गावडे, शहराध्यक्ष वैभव शहा आदी उपस्थित होते.
डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, सर्वसामान्यांच्या न्याय व हक्कासाठी संघर्ष करण्याचे बाळकडू माझे आजोबा लोकनेते बाळासाहेब विखे यांच्याकडून मिळाले आहे. मात्र राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी कुणी दबाव आणि दहशतीचे राजकारण करीत असले तर त्यांचा माज उतरवू. ही निवडणूक माझ्या वा राम शिंदेंच्या प्रतिष्ठेची नसून कर्जतकरांच्या विश्वासाची आणि स्वाभिमानाची लढाई आहे, असे खासदार विखे पाटील यांनी सांगितले.
from https://ift.tt/3EztDQL