✍सतीश डोंगरे
शिरूर : विविध रुग्णालयांमध्ये रुग्णांना मदत मिळावी यासाठी शिरूरचे आमदार अशोक पवार नेहमीच प्रयत्नशील असतात. कोणत्याही रुग्णाचे पैशावाचून उपचार थांबू नये ही त्यांची तळमळ असते. दोन दिवसापूर्वीच शिरूर तालुक्यातील गुनाट येथील एका गरीब कुटुंबातील महिलेचे पुण्यातील रूग्णालयाचे सहा लाख रुपयांचे बिल त्यांनी माफ केले. त्यावेळी भावनाविवश झालेल्या कुटुंबाने आमदार पवार यांचे हात जोडून आभार मानले.
शिरूर तालुक्यातील गुनाट येथील शेतकरी कुटुंबातील सौ.अरुणा सुखदेव डोंगरे यांना हृदयविकाराचा झटका आला होता. स्थानिक डॉक्टरांच्या सुचनेनुसार त्यांना तातडीने हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी पुण्याच्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु या ठिकाणी दाखल केल्यानंतर हृदय शस्त्रक्रियेसाठी अनामत रक्कम म्हणून दोन लाख रुपये भरण्याची सूचना रुग्णालयाने केली.
रुग्णाची अर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे एवढे पैसे जमविणे कठीण होते. मात्र अशाही परिस्थितीत या कुटुंबियांच्या नातेवाईकांनी धावपळ करीत दोन लाख रुपये जमा केले व रुग्णालयात भरले. त्यानंतर संबंधित रुग्ण महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर दोन दिवसांपूर्वी रुग्णाला दवाखान्यातून डिस्चार्ज देताना हॉस्पिटल प्रशासनाने या महिलेच्या नातेवाईकांकडे तब्बल आठ लाख रुपयांचे बिल सोपविले. या बिलाचा आकडा पाहून रुग्णाचे नातेवाईक घाबरून गेले. आता एवढी मोठी रक्कम कशी उभी करायची असा प्रश्न त्यांना पडला.
त्यानंतर रुग्णाच्या कुटुंबियातील गहिनीनाथ डोंगरे यांनी थेट आमदार अशोक पवार यांना संपर्क साधला. त्यावेळी योगायोगाने आमदार पवार हे पुण्यातच जिल्हा बँकेत एका बैठकीसाठी उपस्थित होते. तेथून त्यांनी संबंधित रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधून बिल माफ करण्याची सूचना केली मात्र संबंधित रुग्णालय प्रशासनाने त्यांना फोनवर दाद दिली नाही. त्यानंतर आमदार पवार यांनी बँकेतील बैठकीतून थेट रुग्णालयात धाव घेतली. त्यानंतर तेथील रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरत आठ लाख रुपयांपैकी तब्बल सहा लाख रुपयांचे बिल माफ करण्यास भाग पाडले.
आमदारांचा रुद्रावतार पाहून प्रशासनही नमले. त्यानंतर गुनाटचे माजी सरपंच गहिनीनाथ डोंगरे व इतर नातेवाईकांनी शुक्रवारी आमदार अशोक पवार यांची शिरूर येथे भेट घेऊन पेढे व पुष्पगुच्छ देत त्यांचे आभार मानले.

from https://ift.tt/mK2dI6h

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *