रावणाचा अंत झाला.तसं प्रभु श्रीराम म्हणाले,”वैरी मेला वैर संपले.” बिभीषणाला जवळ बोलावून ते म्हणाले,आपण आपल्या बंधुचे यथोचित उत्तरकर्म करावे.रामायणातील हा प्रसंग आपल्याला काय शिकवतो?आपण यातून काहीच शिकत नाही हे अगदी सत्य आहे.माणूस मेल्यानंतर आपलं आणि त्याचं काही बिनसलेलं असलं तर एका क्षणात आपण प्रतिक्रिया देतो,बरा मेला,त्यानं असं केल्यामुळे त्याला असं मरण आलं.असही ऐकायला मिळतं,त्याच्या मयतीला सुद्धा जाणार नाही आणि खरच जात सुद्धा नाहीत.
आपण खरंच कुणाच्या मृत्यूचं गणित मांडु शकतो?कुणाच्या संचितात काय दडलय हे सांगता येतं?आपण तेवढे पाक पवित्र आहोत का?हा प्रश्न उभा रहातोच.पण त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष करणंच योग्य वाटतं.
प्रभु श्रीरामांनी रावण एकदाच मारला.आम्ही मात्र युगानुयुगे त्याचं दहन करतोय.पण तरीही ना रावण कळाला,ना राम कळाला.आपल्यातला रावण जळतच नाही, हे अज्ञानाचं कारण आहे. वारंवार रावण जाळावा लागतो कारण तो आपल्याच अंतकरणातला दुष्टभाव आहे.आपली वृत्ती राम होत नाही तोवर ही क्रिया घडतच रहाणार.
ज्या क्षणी राम कळेल त्या क्षणी तो आपोआप जळेल.ती वृत्ती जन्म घेईल,जी रामरुप करील.मेलेल्या मनुष्याबद्दल तेव्हाच चांगलं बोलता येईल जेव्हा मृत्यू बरोबर सर्व जगत व्यवहार नाहीसे होतात हे कळेल.त्यासाठी आपली रावण वृत्ती नाहिशी व्हायला हवी.कोण कसा मरणार आहे हे का अभ्यासावं?अभ्यासच करावासा वाटला तर ‘मी’कसा मरणार आहे याचा करावा.आपली पापकर्मं फेर धरून नाचत असतात पण तो नाच दुसऱ्यांना दिसत नाही या एकाच भरवशावर नवं पाप करण्याची इच्छा होते.
मन अत्यंत घात करणारं इंद्रिय आहे.राखण करणाऱ्या राखणदाराकडे मालकाने जर लक्षच दिलं नाही तर तेथेच चोरी करण्याचा मोह त्याला होतो.तसं या मनाने काय विचार करावा,यावर बुद्धी नियंत्रण ठेवते.ते नियंत्रण चोख नसलं की ते विकारांची मैत्री घडवणारच.मनावर नियंत्रण ठेवावं असं वाटत असेल तर त्याचा लगाम भगवंताच्या हाती असला पाहिजे. नामचिंतनानेच हे साध्य होते.नामस्मरण हे रामबाण आहे.
रामकृष्णहरी

from Parner Darshan https://ift.tt/3oxY0QL

By News

Leave a Reply

Your email address will not be published.