
साधू म्हणजे सदगुरु. सदगुरुंचा उपदेश, म्हणजे त्याला अनुग्रह, दिक्षा,प्रसाद,ज्ञान,कृपा अशा नावांनी संबोधलं जातं.हा बोध होत नाही तोपर्यंत, मनात अनेक प्रश्न उभे रहातात.आपण अध्यात्माची कितीही उलटतपासणी केली तरी हाती काहीच येत नाही. आपण आत्मतत्वाने एकच आहोत हे कळायला सदगुरुंशिवाय दुसरा मार्ग नाही.
माऊली म्हणतात, साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला।ठायींच मुराला अनुभव।। सदगुरुंच्या कृपेनेच शक्ती स्थापित होते.देहभाव गळुन पडतो,आत्मस्वरुपाचे भान निर्माण होते आणि ब्रम्हानुभुती येते.पण हा अनुभव इंद्रियांद्वारेच घेता येत असल्याने तो चित्तात स्थिरावला पाहिजे.यासाठी जी साधना करावी लागते ती प्रापंचिकाला शक्य आहे. तो अनुभव घेताही येतो आणि तो मुरवताही येतो.या प्रक्रियेने जन्म,मृत्यू,दुःख नष्ट होते.
या अवस्थेत साधकाची झालेली अवस्था सांगताना माऊली म्हणतात,
कापुराची वाती उजळली ज्योति । ठायींच समाप्ति झाली जैसी ॥२।। कापुराला अग्नी दिला की तो अग्नीरुप होतो.शेवटी अग्नीही शिल्लक रहात नाही आणि कापुरही शिल्लक रहात नाही. अशी साधकाची अवस्था होते.देहभाव नष्ट होऊन ब्रम्हैक स्थिती येते.
सज्जनहो पुढच्या भागातही यावर आपण चिंतन करणार आहोत.मी बंधनं पाळुन यावर चिंतन लिहिले आहे. आपण या ब्रम्हानुभुतीचा पुरस्कार केल्याखेरीज हे चिंतन कळणार नाही. तरीही सोप्या भाषेत मांडण्याचा छोटासा प्रयत्न करीत आहे.हे साखरेचे वर्णन आहे,गोड आहे पण प्रत्यक्ष साखर खाल्ल्याखेरीज ती किती आहे हे कळणार नाही हे ही तितकेच खरे आहे.
रामकृष्णहरी
from https://ift.tt/3ECPqWU