
आत्मज्ञान हा असा खजिना आहे की तो उघडता आला की बाष्कळपणा संपतो,दिवस नित्य नवा वाटु लागतो.वैरभाव नाहीसा होतो.जीवनभर कशासाठी वेळ खर्च करायचा याचे भान येते,स्वैराचार नष्ट होतो,समाजमन वाचण्याची शक्ती प्राप्त होते,त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याचं बळ प्राप्त होतं.अहंतेशी जोडणाऱ्या गोष्टींचा आपोआप विट येतो.
माऊली हरिपाठात म्हणतात,
तपेंवीण दैवत दिधल्याविण प्राप्त । गुजेंविण हित कोण सांगे ॥३॥ ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात । साधूचे संगती तरणोपाय ॥४॥
तपसाधना केल्याशिवाय कोणतेही दैवत प्रसन्न होत नाही. आता ही दैवतं कोणती?कोणत्या दैवताला प्रसन्न करुन घ्यायचं आहे?हे इथं थोडक्यात सांगता येणार नाही पण इतकच म्हणता येईल की ती दैवतं अंतर्भूत आहेत.देव देव म्हणुनी व्यर्थ का फिरशी।निज देव मुळी जाणशी कोण।। हे त्यासाठीच म्हटलेलं आहे. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा।अखंडित सेवा करा याची।। आत्मज्ञान हेच ते दैवत आहे.
या देवाला जागं करण्यासाठी तपसाधना करायची आहे. दिधल्यावीण प्राप्ती नाही. म्हणजे काही दिल्याशिवाय प्राप्त होणार नाही. काय द्यावं लागेल?काही धनसंपदा द्यावी लागत नाही. आपल्या प्रपंचाला देत असलेला काही वेळ या साधनेसाठी द्यायचा आहे.या साधनेसाठी दिलेला वेळही पुन्हा प्रपंचातच लावायचा आहे. झाली ना गडबड?काय आहे ही साधना आणि ती कशी करावी?त्यासाठी माऊली म्हणतात, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात।साधूंचे संगती तरणोपाय।। आत्मज्ञान झाले की त्यातुन आत्मानुभुती प्राप्त होते.ही आत्मानुभुती आपलं जीवन बदलून टाकते.आपण कालपर्यंत किती व्यर्थ जीवन जगत होतो याचे भान निर्माण होते.पण हे सगळं कसं पल्याड जीवनात यावं असं वाटत असेल तर साधूंच्या संगतीशिवाय हे शक्य होणार नाही.
पण एक लक्षात ठेवा कर्मकांडात अडकवणारा साधू हा साधु नसुन स्वतःसाठी काहीतरी साधणारा असतो.खरा साधू तुम्हाला थेट आत्मज्ञानाने आत्मबोध देण्यास समर्थ असतो.तोच गुरुरुपाने ती तपसाधना तुमच्याकडून करुन घेतो.
रामकृष्णहरी
from https://ift.tt/3qopFEX