
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 13 वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र आजही या हल्ल्याच्या थरारक, वेदनादायी, कटू आठवणी प्रत्येक मुंबईकर आणि भारतीयाच्या मनात कायम आहेत.
अचानक झालेल्या मुंबई हल्ल्याने संपूर्ण जग हादरलं होतं. 2008 मध्ये पाकिस्तानमधून दहा दहशतवादी समुद्राच्या मार्गे मुंबईत घुसले. लष्कर ए तोयबाच्या या अतिरेक्यांनी मुंबईच्या ताज हॉटेलसह सहा ठिकाणी हल्ला केला. ज्यात 160 हून अधिक निरपराधांचे प्राण गेले.
दहशतवाद्यांनी हॉटेल ताज, नरिमन हाऊस, होटल ओबेरॉय आपल्या ताब्यात घेतलं होतं. तसेच अनेक प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्येही हल्ला केला. त्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात सर्वाधिक मृत्यू हे छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे झाले. तर हॉटेल ताजमध्ये दहशतवाद्यांनी 31 जणांचा जीव घेतला. दरम्यान त्यांनी एक टॅक्सी बॉम्बने देखील उडवली.
पोलिसांना मदत म्हणून रॅपिड अॅक्शन फोर्स (आरपीएफ), मरिन कमांडो आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एनएसजी) कमांडो यांना पाचारण केलं गेलं. मात्र या अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना तब्बल तीन दिवस लागले. जवळपास 60 तास दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक सुरुच होती.
हल्ल्यादरम्यान हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह अनेक पोलीस कर्मचारी शहीद झाले. एकूण 10 दहशतवाद्यांपैकी एका दहशतवाद्याला जिंवत पकडण्यात पोलिसांना यश आलं. तो दहशतवादी म्हणजे अजमल आमीर कसाब. कसाबला जिवंत पकडता आल्यामुळेच आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आणण्यास मदत झाली. 21 नोव्हेंबर 2012 रोजी सकाळी साडेसात वाजता कसाबला फासावर लटकवण्यात आलं.
from https://ift.tt/3cRyW1I