आपण सतत मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो.त्यात,पैसा,स्थावर,जंगम पत,प्रतिष्ठा सगळं आलं.पण प्रत्येकाला यश येतेच असं नाही. प्रयत्न प्रामाणिक असले तरी यश हुलकावणी देते.प्रयत्न अप्रामाणिक असले तर आलेले यशही फार काळ तग धरीत नाही. एकंदरीतच काय!तर यश अपयशाचा हा खेळ सतत सुरू असतो.
सत्याधिष्ठीत व्यक्ती पुन्हा नव्या जोमाने कामाला लागतात.पण अपयशाची सल मनात असतेच.दोनही वृत्तीच्या व्यक्तींना एकच ध्येय गाठायचे असले तरी मार्ग कोणता निवडला?याला फार महत्त्व आहे. कारण अविचाराचं निर्माण त्याच्याशीच निगडीत आहे.
तुकोबाराय म्हणतात,
जोडोनिया धन उत्तम व्यवहारे।
उदार विचारे वेच करी।।
धन मिळवताना ते योग्य मार्गाने मिळवता आले पाहिजे.योग्य मार्ग म्हणजे धर्मसंमत मार्ग होय.धर्मशास्त्रात चार प्रकारचे पुरुषार्थ सांगितले आहेत. धर्म,अर्थ,काम आणि मोक्ष.धर्माचे अनुसरण करणाराला अर्थ म्हणजे येथे धन हा अर्थ घ्यावा लागेल.तो मिळवताना धर्माचं अधिष्ठान असल्याने तो उत्तर गतीनेच मिळवला जाईल.पुढचे दोन पुरुषार्थ काम आणि मोक्ष मात्र कठीण आहेत.कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी धर्म नितीशास्राचा तो भोक्ता असला तरच ते शक्य होणार आहे. त्यातुनच मोक्ष वाट सापडु शकेल.मोक्ष म्हणजे निरंक अवस्था आहे. सुख दुःखाच्या पुढे गेलेली ती अवस्था आहे. हा मोक्ष मेल्यावर मिळत नाही. कारण जर त्याची गणना पुरुषार्थात होते,तर मग ती जीवंत असतानाच मिळवावी लागेल हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
या व्यतिरिक्त जे जे असेल ते धर्म विसंगत असेल.अविचारांच निर्माण इथुन होणार आहे. इथं इर्षा,असुया,दंभ उपस्थित असल्याने आलेलं अपयश पचवता येत नाही. मग सुरू होतो तो प्रयत्न दुसऱ्याला त्रास देण्याचा.
एका व्यक्तीला देवाने वर मागायला सांगितले. पण अट ही ठेवली की तु जे मागशिल त्याच्या दुप्पट तुझ्या शेजाऱ्याला मिळेल.भक्त जरी असला तरी विचार विभक्ती सुटेलच असं नाही. या व्यक्तीची वृत्ती विभक्त असल्याने त्याने देवाकडे वर मागितला की माझा एक डोळा जाऊदे…पुढे काय झालं असेल ते आपण जाणताच.ही गोष्ट काल्पनिक आहे. पण वृत्तीदर्शन समजण्यासाठी पुरेशी आहे.
असं जीवन आपल्या वाट्याला येऊ नये असं वाटत असेल तर पहिला धर्मशास्त्राचा विचार पटला पाहिजे. त्यासाठी सत्संग आवश्यक आहे. चांगल्या विचारांची देवाणघेवाण सुविचार निर्माणाचं महाकेंद्र आहे. या महाकेंद्राची निर्मिती आपणच करावी लागते.
रामकृष्णहरी

from https://ift.tt/EqIbipD

By News

Leave a Reply

Your email address will not be published.