मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्य सरकारने घेतलेल्या वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात आंदोलनाची घोषणा केली होती. रविवारी राळेगण सिद्धीमध्ये झालेल्या ग्रामसभेनंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. ग्रामसभेत झालेल्या ठरावानुसार या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होणार का हे पाहण्यासाठी काही वेळ द्यावा म्हणून अण्णांनी हे आंदोलन मागे घेतले.तर अण्णांनी हे आंदोलन मागे घेतल्याने आता त्यांच्यावर टीका देखील होत आहे. शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या सामना या दैनिकातून आज अण्णा हजारे यांच्यावर कठोर शब्दांत टीका करण्यात आली आहे.
सामनामधून अण्णा हजारे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी महाराष्ट्राचा अपमान केला. अण्णा महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी दोन कठोर शब्द बोलतील असं वाटलं होतं, पण अण्णांनी महाराष्ट्राचा अपमान गिळला आणि ‘वाईन वाईन’चा गजर करीत ‘आता जगणे नाही’ असा सूर लावला, पण अण्णा आता जाणार कुठे? आम्हाला अण्णांची चिंता वाटते अशा शब्दांत सेनेने अण्णांवर टीका केली.
‘सामना’मध्ये काय म्हटलंय?
दिल्लीत व महाराष्ट्रात काँग्रेसचं राज्य असताना अण्णा ऊठसूट उपोषणं व आंदोलनं करायचे. रामलीला मैदान, जंतर मंतरवर त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध रणशिंग फुंकलं, त्या रणशिंगात हवा फुंकणारे आज दिल्लीतील सत्ताधीश आहेत, पण ज्या ‘लोकपाल’साठी अण्णांनी लढाई केली तो लोकपाल आज गुजरात राज्यातही नेमला गेला नाही, दिल्ली तो बहोत दूर है! ‘‘मी इतका मर मर मेलो, उपोषणं केली, पण कर्मदरिद्री भाजपवाले एक लोकपाल नेमायला तयार नाहीत. आता जगायचं कशाला?’’ असा त्रागा खरं तर अण्णांनी करायला हवा होता, पण महाराष्ट्रातील सुपर मार्केटमध्ये वाईन विकायला ठेवली म्हणून त्यांना जगायची इच्छा राहिलेली नाही. असं सामनामध्ये म्हटलं आहे.
अण्णांवर टीका करताना सेना एवढ्यावरच थांबली नाही, पुढे सामनामध्ये म्हटलंय की, हे खरं की, व्यसनांनी लोकांची आयुष्यं उद्ध्वस्त झाली आहेत. गावागावांत महिलांनी दारू दुकानांविरोधात आंदोलनं केली आहेत, पण महाराष्ट्र आपली प्रतिष्ठा आणि संस्कार कधीच विसरणार नाही, हे काय अण्णा हजारे यांना माहीत नाही?
अण्णांनी राज्यात जल संधारणाची, ग्राम सुधारणेची वगैरे चांगली कामं केली आहेत. त्याच तोडीची कामं बाजूच्या पोपटराव पवारांनी केली व त्याबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं, पण महाराष्ट्रात जगायची इच्छा नाही असं ते कधी म्हणाले नाहीत.

from https://ift.tt/UJD9vlr

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *