पारनेर : सुपर मार्केट आणि किराणा दुकानामध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरुद्ध ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणास्त्र उपसले होते. मात्र, राज्य सरकारकडून आंदोलन न करण्याची विनंती करण्यात आल्यानंतर अण्णा हजारेंनी उपोषण न करण्याचा निर्णय घेतला आहे.राळेगणसिद्धी येथे आज ( रविवारी ) झालेल्या ग्रामसभेत अण्णा हजारेंनी उपोषण न करण्याबद्दल भूमिका स्पष्ट केली.

सुपर मार्केटमधून वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी १४ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला होता. मात्र सरकारने हजारे यांनी उपोषण न करण्याची विनंती केली. त्यानंतर आज (१३ फेब्रुवारी) राळेगणसिद्धी येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेत अण्णा हजारे यांनी नियोजित उपोषण स्थगित करीत असल्याचे जाहीर केले.

सरकारने ९० दिवसांत या निर्णयावर जनतेचे मत जाणून घ्यावे आणि त्यांनतर अंतिम निर्णय घ्यावा, असा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर उपोषण न करण्याबाबत अण्णा हजारे यांना विनंती करण्यात आली. त्यानुसार हजारे यांनी उद्यापासून करण्यात येणारे उपोषण स्थगित केले आहे. या वयात अण्णांनी आता उपोषण करू नये, असे आवाहन ज्येष्ठ नागरीक अरुण भालेकर यांनी केले.

“तुमच्या राज्यात मला जगायची इच्छा नाही, असे मी सरकारला कळवले होते आणि त्यानंतर मग सरकारी पातळीवर हालचाली सुरू झाल्या. जे निर्णय घ्यायचे ते जनतेचं मत विचारात घेऊन घ्यावेत. वाईन संबंधीचा निर्णय जनतेला विचारून घ्यायला हवा. व्यसनामुळे लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. माझे आयुष्य मी समाज आणि देशासाठी दिलं आहे. त्यामुळे अशा चुकीच्या निर्णयांविरुद्ध लढा देत राहणार,” असे अण्णा हजारे यांनी ग्रामसभेत बोलताना सांगितले.

“या पुढे सरकारने आपल्या मनाने कोणतेही निर्णय घेऊन जनतेवर लादू नयेत, तसं झाले तर ग्रामसभा आंदोलन करतील. केवळ राळेगणसिद्धी नव्हे, राज्यातील सर्व गावात असे निर्णय घ्या. सरकारने यापुढे प्रत्येक ग्रामसभेला विश्वासात घेऊन निर्णय घ्यावेत, असा राळेगणसिद्धी ग्रामसभेचा निर्णय घेण्यात आला. तसंच पुढील तीन महिन्यात वाईनसंबंधी जनमत जाणून घ्या. लोक नको म्हणाले, तर निर्णय रद्द करा,” असेही अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.

from https://ift.tt/WvXTAZR

By News

Leave a Reply

Your email address will not be published.