
पुणे: वास्तववादी लेखक, ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते आणि तरुणांना व्यसनमुक्त करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मुक्तांगण या संस्थेचे संस्थापक डॉ. अनिल अवचट यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या पश्चात त्यांच्या विवाहित मुली मुक्ता आणि यशोदा, अन्य कुटुंबीय आणि मोठा मित्रपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारीच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या जाण्याने सामाजिक जाणीव असलेला आणि बालसाहित्यात मोठं योगदान देणारा साहित्यिक गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
साहित्यिक अनिल अवचट गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर आधी येथील संचेती रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. आज सकाळी सव्वा नऊ वाजता त्यांनी पत्रकार नगर येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी त्यांच्या दिवंगत पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासोबत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली होती. तरुणांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी त्यांनी या संस्थेची स्थापना केली होती. डॉ. अनिता आणि अनिल अवचट यांच्या व्यसनमुक्त क्षेत्रातील कार्याचा वसा यापुढेसुद्धा असाच पुढे चालू राहील, असे मुक्तांगणचे अध्यक्ष डॉ. आनंद नाडकर्णी यांनी ही दुःखद बातमी सांगताना सांगितले.
from https://ift.tt/3IDE4Va