
आपण अध्यात्मिक वाटा चोखाळत असताना आत्मसाक्षात्कार होणं म्हणजे जीवनात नवजीवन सुरू होणे आहे. माऊली म्हणतात, आजी सोनियाचा दिनु वर्षे अमृताचा घनु।हरी पाहिला रे हरी पाहिला रे।। ही अवस्था काय आहे?आपल्या जीवनात सोन्याचा दिवस उगवला आहे का?हरी पाहिलाच नाही तर असा दिवस जीवनात येईलच कसा?रुप पहाता लोचनी ।सुख झाले वो साजनी।। कोणतं रुप आणि कोणत्या डोळ्यांनी पाहिलं?आपला अनुभव काय आहे?डोळ्यांनी रुप पाहिलच नाही तर ते सुख प्राप्त होईलच कसं?भगवंत आणि साधक यामधला दुवा म्हणजे गुरु.पुढे गुरुच परब्रम्ह आहे याची प्रचिती येते.
गुरु कुणाला करावं ? जिथं आपलं समाधान होतं, संशय,शंका,कुशंका फिटतात तेच गुरुपद म्हणावे. गुरुपद, गुरुतत्व सर्व ठिकाणी एकच असते म्हणूनच ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे । त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे
मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी । तेथे तुझे सदगुरु पाय दोन्ही ॥ असा गुरुंचा आदर व्यक्त केला जातो.
गुरुतत्व एकच आहे.सर्व सदगुरुंमध्ये आपले सदगुरु आपल्याला पाहता आले पाहिजे. सद्गुरु साधकाला समाधानात ठेवून संकटे सहन करण्याची शक्ती देतात. त्याने प्रारब्ध बदलत नाही. पण त्याने साधकाला बाधाही निर्माण होत नाही तो विचलीत होत नाही.आलेला भोग आनंदाने भोगण्याचं बळ प्राप्त होत.
आपल्याला जर आध्यात्मिक ज्ञान मिळावे असे वाटत असेल तर सदभावाने सदगुरु चरणाची सेवा करावी.
जेव्हा साधकाला अनुग्रह होतो तेव्हा तो त्याचा दुसरा जन्म असतो. त्याच्या साधना काळात सदगुरु साधकाचे सर्वतोपरी रक्षण करतात. सदगुरु आपल्या जीवनाला, विचारांना दिशा देतात. वेळोवेळी मार्गदर्शन मिळते. जीवन सुपंथावर चालते. अध्यात्मज्ञान त्यांच्या कृपेनेच मिळते. सदगुरुंचा सहवास हा सुमधुर असतो. ते चालते-बोलते ईश्वराचे अंशच असतात.
साधकाने कोणत्याही गुरुंची निंदा करू नये. तसेच आपल्याही गुरुंची निंदा कोणी केलेली ऐकू नये. तिथून निघून जावे. गुरुनिंदा करणे म्हणजे महापाप होय. गुरु ही कोणी व्यक्ती नसून ती एक चैतन्यशक्ती आहे.
गुरूंचे अनेक प्रकार आहेत. पृच्छक गुरु, चंदन गुरु,अनुग्र्ह गुरु,कर्म गुरु,विचार गुरु, वात्सल्य गुरु,स्पर्श गुरु. पण याहुन सदगुरु वेगळे आहेत.सदगुरु शिष्याला कर्मकांडात अडकवत नाहीत.ते शिष्याकडुन कोणतीही अपेक्षा करीत नाहीत,ते शिष्याकडुन स्वतः साधना करुन घेतात.ते शिष्याला आपल्याहुनही श्रेष्ठ करण्याचा प्रयत्न करणात.
शिष्याने स्वतः साधन स्विकारल्याशिवाय ज्ञान प्राप्त होणार नाही याची ते वारंवार आठवण करुन देतात.
सज्जनहो सदगुरुंची प्राप्ती झाली म्हणजे सर्व काही मिळालं असं होतं नाही. ही जादुची कांडी नाही.त्यांनी दिलेले साधन शिष्याने मनोमन केले पाहिजे. शिक्षक पुढे शिकवतात पण विद्यार्थी वर्गाबाहेर पहात राहिला तर नापासच होणार. इथही तसच आहे. अभ्यास दिला आहे,पण जर घासलं नाही तर भांडं लखाकत नाही तसच हे आहे. साधनेने आपल्या देहावर झालेले कुसंस्कार हळूहळू नाहिसे होतात.सदगुरु भेटुनही साधन केले नाही तर काहीच प्राप्त होणार नाही. साधकाने स्वतः चालायचे आहे.आचरण शुद्धता आपोआप येत नाही.अर्जुन चौतीस वर्षे भगवंताच्या सानिध्यात राहिला पण ज्ञान झाले नाही हा इतिहास आहे.ते युद्ध भुमीवर झाले.ही चौतीस वर्षे कोणती?,ती युद्धभूमी कोणती? हे सांगणारा सदगुरु होय. आत्मसाक्षात्कार आपल्यातले दुर्गुण,कुसंस्कार गेल्याशिवाय होत नाही.देहावरचं प्रेम त्याशिवाय कमी होत नाही. त्यासाठी सदगुरुंनी सांगितलेले साधन करणे हाच एकमेव मार्ग आहे.मी या वाटेवरचा पांथस्थ आहे,आनंद घेतो आहे.ते साधन म्हणजे काय?हे पुढील भागात पाहु.
रामकृष्णहरी
from https://ift.tt/3t9lwaX