सत्य हे प्रखर आहे. जसं तप्त तव्यावर हात ठेवण्याचं धाडस कुणी करीत नाही, तसंच सत्यावर चालणं आहे.प्रपंचात घडोघडी खोटं वागण्याचा प्रसंग येतो.मग पुढे हीच जीवन रहाटी बनते. 
तुकोबाराय म्हणतात,
 सत्या देव साहे।ऐसे करुनिया पाहे।।
अन्न मान धन।हे तो प्रारब्धा अधीन।
तुका म्हणे सोसे।दुःख आता पुढे नासे।।
सत्यास प्रत्यक्ष देवच सहाय्यक होतो.पण ते स्विकारण्याचं धाडस केलं पाहिजे.अन्न मान आणि धन या गोष्टी मिळतात पण ते किती उपलब्ध होणार हे प्रारब्धा अधीन आहे.
दोन मित्रांची चर्चा सुरू होती,की जेवण देणारा सर्वसाक्षी आहे. तो नियंता सर्व जीवांची काळजी वहातो.पण दुसऱ्या मित्राला हे पटेना.तो म्हणाला की मी दोन दिवस उपाशी राहतो पाहु कोण जेऊ घालतं? मग तो उपाशी राहिला.दुपारनंतर पत्नीने टुमने लावले,जेवुन घ्या, जेवुन घ्या,जेवुन घ्या.मग तो जंगलात जायला निघाला.पत्नी घाबरली,तिला वाटले काहीतरी विपरीत झाले आहे. पती माझ्यावर रागावले आहेत. तिने पटकन जेवणाचा डबा भरुन दिला.म्हणाली आमचा राग जेवणावर काढु नका.पाहिजे तेव्हा जेवा.पण हा डबा सोबत न्या.बायकोच्या समाधानासाठी त्याने डबा सोबत घेतला.जंगलात गेला म्हणाला आता कोणीही जेवणाचा आग्रह करणार नाही. रात्र झाली. पण पोटात काही नसल्याने झोप येईना.मध्यरात्रीनंतर दोन चोर चोरी करुन तेथे आले ते पळुन पळुन थकले होते.त्यांनी याला पाहिले.झडती घेतली पण त्यांना काही मिळाले नाही. जवळ असलेला जेवणाचा डबा तेवढा मिळाला.दोघांनाही भुक लागली होती.ते पटकन जेवायला बसले.पण एकाने शंका व्यक्त केली की यात विष तर नसेल?मग काय ते त्याला म्हणाले,तु पहिल्यांदा खा.त्याने परोपरीने समजावले,की मला जेवायचे नाही. पण चोरांनी अधिक वादावादी न करता त्याला दोन ठोसे लगावले.त्या सरशी नाकातुन रक्त वाहू लागले.आता अधिक मार खाण्यापेक्षा जेवलेलं बर म्हणून तो आधी जेवायला बसला.दुसऱ्या दिवशी तो मित्राला म्हणाला हा ज्याला जेवण द्यायचं त्याला देतोच.तसं खाल्ल नाही तर ठोसे देऊन खाऊ घालतो.
दुसरे उदाहरण आपल्या नित्य पहाण्यात असते की सर्व सुखं लोळण घेत असतात,पण शारीरिक व्याधी गोडधोड खाऊ देत नाहीत. गोड खायचं नाही, तेलकट,तुपट खायचं नाही, मिठाचं खायचं नाही,रोज चार किलोमीटर पायी चालायचं.यात ऐश्वर्यभोग राहिला कुठे? पुढच्या दोन गोष्टी मान आणि धन सांप्रत कर्माने प्रारब्धात प्राप्त होतात.गरज आहे ती सत्याची कास धरून चालण्याची.सत्यावर चालताना त्रास होणार आहे.
पण तुकोबाराय म्हणतात,
तुका म्हणे सोसे।दुःख आता पुढे नासे।। आता दुःख सोसलं तर पुढे उत्तरार्धात ते दुःख संपणार आहे. म्हणजेच सुखाची प्राप्ती होईल.
रामकृष्णहरी

from https://ift.tt/jzTkxHb

By News

Leave a Reply

Your email address will not be published.