
विचारांची श्रीमंती ही पिढीजात आलेली असते.ती तयार करणे कठीण असते.श्रीमंत विचारांचा वारसा सुसंस्काराने गर्भश्रीमंत करता येतो.एकदा मी एका खेडेगावात प्रवचनासाठी गेलो होतो.आम्ही निराधार आईबाबांसाठी मोफत सेवाकार्य करत आहोत हे विचारादरम्यान सांगितले होते.प्रवचन संपल्यावर एक वृध्द आई काठी टेकवत माझ्याजवळ आली आणि गाठ मारुन पदरात बांधलेले सदुसष्ठ रुपये माझ्या हातात टेकवले,आणि म्हणाली,”महाराज तुमच्या या कार्यासाठी खूप काही देण्याची इच्छा आहे. पण माझ्याकडे याहून अधिक नाही.”
मी भारावून गेलो,डोळे डबडबले.त्याहून मोठा धक्का तर मला त्यावेळी बसला,साधारण प्रवचन सेवा संपल्यावर तासदिड तासाने आम्ही निघालो असेल,रस्त्याने या आई एकट्याच पायी चालल्या होत्या.
आम्ही गाडी थांबवली आईंना गाडीत बसवले वाटले होते जवळच घर असावे.पाच कि.मीटर गाडी गेल्यावर त्यांनी थांबण्याचा इशारा केला.न रहावुन मी आजींना विचारलं तुम्हाला कोणी न्यायला येणार होतं का?त्यांनी मंद स्मित केलं आणि म्हणाल्या,”मुलगा सुन दोघेही अपघातात दोन वर्षांपूर्वी मरण पावले एक नातु आहे आठ वर्षांचा,शाळेत गेला असेल आता.माझ्याकडे जायला खर्ची नसल्याने मी पायी निघाले होते.”आता मात्र मी डोळ्यांतील पाणी रोखु शकलो नाही. त्यांना साडी चोळी आणि मुलाला एक ड्रेस घेतला आम्ही बरीच विनंती केल्यानंतर त्यांनी ते स्विकारले.
आम्ही त्या आईला साष्टांग दंडवत घातला.आज एका गर्भश्रीमंत आईंचं दर्शन झालं होतं.त्यानंतर अनेक वर्षे या आईंची सेवा करण्याच़ भाग्य प्राप्त झालं.आजही हा प्रसंग लिहिताना अंगावर रोमांच दाटले आहेत.सात्विक आणि समर्पित जीवन जगण्याची खूप एनर्जी मिळाली होती.माझी हजारो प्रवचनं तिच्या दातृत्वापुढे शुन्य होऊन नमस्कार करत होती.
तुकोबाराय म्हणतात,
मुखी बोले ब्रम्हज्ञान।
मनी धन अभिमान।।१।।
ऐशियाची करिता सेवा।
काय सुख होई जीवा।।ध्रु।।
पोटासाठी संत।
झाले कलित बहुतं।।२।।
विरळा ऐसा कोणी।
तुका त्यासी लोटांगणी।।३।।
ती अनुभूती एका माऊलीने प्रवचन किर्तनाशिवाय,साध्या जगण्यातुन आम्हाला आज करून दिली होती.
रामकृष्णहरी
from https://ift.tt/317pMLY