
कोल्हापूर : शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी सोमवारी 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दुपारी बारा वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. प्रा. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या शेतकरी, कामगार चळवळीला मोठा धक्का बसला आहे.
मागील काही दिवसांपर्यंत एन. डी. पाटील यांनी रस्त्यावर उतरत आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यांच्या निधनाने शोषित, वंचितांचा आधार हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. एन. डी. पाटील यांनी अनेक लढ्यांचे नेतृत्व केलं असून महाराष्ट्राचा एक पुरोगामी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. आयुष्यभर शेतकरी आणि कष्टकरी लोकांशी बांधिलकी मानुन काम करणारा हा लढवय्या लोकनेता होता. एकाचवेळी अनेक संस्थांचे नेतृत्व करत असताना त्या संस्थाचा कारभार आदर्श रीतीने झाला पाहिजे अशी त्यांची भूमिका राहिली आहे.
महाराष्ट्राचे सहकारमंत्री म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. सांगली जिल्ह्यातील ढवळी हे वाळवा तालुक्यातील एन. डी. पाटील यांचं गाव. शाळकरी वयात असतानाच सत्यशोधक विचार ऐकायला मिळाले. पुढे कर्मवीर भाऊराव पाटील यांची भेट झाली. मग रयत शिक्षण संस्थेशी जवळून संबंध आला. प्राध्यापक म्हणून रुजू झाले. याच दरम्यान त्यांनी नोकरी सोडून पूर्णवेळ शेतकरी कामगार पक्षासाठी द्यायचा निर्णय घेतला. जीवनदानी कार्यकर्ते बनले. नंतर शेतकरी कामगार पक्षाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी काम केले. शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने ते विधानपरिषदेवर गेले.
आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी सभागृह दणादूण सोडले. उपेक्षित लोकांच्या प्रश्नांची सभागृहात चर्चा केली, प्रश्न सोडवले. १८ वर्षे या सभागृहात त्यांनी काम केले. १९७८ साली त्यांना पुलोद सरकारमध्ये सहकारमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामकाजाची आजही चर्चा होते. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फायद्याची ठरलेली कापूस एकाधिकार योजना त्यांनीच सुरू केली.
मंत्री असताना कोणत्याही भूमिपूजन कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि अंमलात आणला. एन डी पाटील यांच्यासमोर महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श होता, त्याच आदर्शाने ते आयुष्यभर वागले. सत्तेत जायची संधी मिळाली, पण तेव्हाही त्यांच्या जगण्यात आणि साधेपणात काहीही फरक पडला नाही.
from https://ift.tt/3FwlagV