
नाशिक : कांद्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील एका कांदा उत्पादक शेतकऱ्याने चक्क कांद्यालाच आपल्या नव्या बंगल्याची ओळख बनवली. या शेतकऱ्याने आपल्या नव्या बंगल्यावर कांद्याचा स्टॅच्यू उभारत आपली कृतज्ञता व्यक्त केली. त्यामुळे या शेतकऱ्याच्या नव्या घराची सध्या चांगलीचं चर्चा रंगली आहे.
ज्या पिकांने लखोपती बनवले, त्या पिकाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यातील धनकवाडीच्या साईनाथ आणि अनिल जाधव या शेतकरी बंधूंनी चक्क आपल्या नव्या बंगल्यावर कांद्याची मोठी प्रतिकृती साकारलीय. त्यामुळे सध्या हे शेतकरी परिसरात चर्चेचा विषय बनलेत. नाशिक जिल्हा कांद्याचं आगार असला, तरी नैसर्गिक संकट आणि बेभरवशाच्या बाजारभावामुळे कांदा नेहमीचं उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणतो. मात्र नशिबानं दिलेली साथ आणि चांगला बाजारभाव मिळाला तर कांदा शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुख-समृद्धीही घेऊन येतो. हे साईनाथ आणि अनिल जाधव या शेतकरी बंधूंच्या उदाहरणावरून दिसून येतंय.
येवला तालुक्यातील या भागात फारसा पाऊस पडत नाही, पाण्याची इतर फारशी सोय नसल्याने कोरडवाहू शेती केली जाते. त्यात साईनाथ आणि अनिल जाधव आपल्या शेतात मागील 20 ते 25 वर्षांपासून कांदा लागवड करीत आहेत मात्र अनेकदा नुकसान सोसूनही कांदा पिकात ठेवलेलं सातत्य, कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर दोघा बंधूंनी कांद्याची यशस्वी शेती केली.
त्यातूनच मागील वर्षी त्यांना कांद्यातून खर्च वजा जाता तब्बल 15 लाख रुपयांचा निव्वळ नफा शिल्लक राहिला. त्यातून त्यांनी आपला टुमदार बंगला बांधला. आणि ज्या कांद्यामुळे स्वतःचं मोठं घर झालं, त्या कांद्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी बंगल्यावर चक्क 150 किलोचा कांद्याचा मोठा स्टॅच्यू उभारलाय.
कांद्याची ही महाकाय प्रतिकृती उभारण्यासाठी त्यांना 18 हजार रुपयांचा खर्च आलाय. मात्र 18 हजारांपेक्षा ज्या पिकांनं आपल्याला तारलं, त्याची उतराई करू शकल्याचा आनंद या दोघा शेतकरी बंधूंना वाटतोय. त्यामुळे सध्या त्यांच्या या अनोख्या कृतज्ञतेचं सर्वत्र कौतुक होतय. अनेक जण खास त्यांच्या बंगल्यावरील कांदा पाहण्यासाठीही येत असून सध्या त्यांचं कांद्याच घर सर्वत्र चर्चेचा विषय बनलंय.
from https://ift.tt/3nFKpYb