
जेवढा व्याप जास्त तेवढी मनाची शुन्य होता येण्याची शक्यता धुसर.शाश्वत अशाश्वताचा निवाडा करता येणे मोठे कठीण. कारण समोर दिसणारा प्रपंचच मुख्य आहे ही धारणा पक्की झालेली असते.स्वतःचं स्तोम निर्माण करण्यालाच यशस्वी जीवनाची कडी समजली जाते.काही माणसं स्वतःला इतक्या उंचीवर घेऊन जातात की तिथं ती एकटी होतात.
लोकांनी चिकटवलेल्या,काही स्वतः चिकटवलेल्या उपाध्या खाली येऊ देत नाहीत.संसारात कितीही मोठं नाव केलं आणि त्याचा संसारातल्या घटकांना काही उपयोग नसेल तर ते सारं शुन्य आहे. पण हे मान्य होत नाही.शिवाय ज्या प्रपंचासाठी सारी धडपड चालू आहे तो ही शुन्य आहे.
तुकोबारायांनी हे जाणलं,त्यामुळेच पळ न काढता त्यांनी संसार जिंकला. या भवरणांगणावर माघार घ्यायची नव्हती.असारातून सार काढायचे होते. दुष्काळ,अस्मानी संकटे आणि मनुष्यदेह संबंधाने माता,पिता, पुत्र आणि संपत्ति यांचे मूल्यमापन झाले होते. अशाश्वतता पटली होती. त्यामुळे तुकोबाराय शाश्वत मूल्यांचा शोध करूं लागले.या उद्वेगातून पार कसे पडता येईल या भवसागरातुन पैलतीर कसे गाठता येईल, हा विचार त्यांनी केला.म्हणून शुन्य अवस्थेत जाता आले.
संसाराच्या नावे घालोनिया शून्य । वाढता हा पुण्यधर्म केला ।।
सज्जनहो, आपणही शुन्य होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे शुन्य होणं म्हणजे प्रपंचातुन पळ काढणं नव्हे.चिखलात राहुनही अंगाला चिखल लागु न देण्याचं कमळाचं जीवन जगता आलं पाहिजे.दुःख अतिव होऊनच मरावं लागतं याचं कारण शुन्य होता येत नाही.स्थार्थी कर्माने अहंकार येतोच.आणि अहंकाराने उपाध्यांमधुन बाहेर येता येत नाही. त्यामुळे सत्य कळण्याचे मार्ग बंद होतात.
महाराज म्हणतात,पुसावे ते ठाई आपुल्या आपण।अहंकारा शुन्य घालुनिया।। त्याशिवाय सत्प्राप्ती नाही. आपण प्रयत्न केला पाहिजे. मी या वाटेवरचा पांथस्थ आहे. थोडं जरी जमलं तरी आनंद आभाळभर आहे.
रामकृष्णहरी
from https://ift.tt/3oY6lO7