
पारनेर : नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल काल (बुधवारी) जाहीर झाल्यानंतर त्रिशंकू अवस्थेत असलेल्या नगर पंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आता बहुमताचा आकडा गाठला आहे. आमदार निलेश लंके, पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या उपस्थितीत शहर विकास आघाडीच्या दोन नगरसेवकांचे राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश झाले.
प्रभाग क्रमांक ११ मधील नवनिर्वाचित नगरसेविका सुरेखा अर्जुन भालेकर तसेच भूषण उत्तम शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला साथ देण्याचा निर्णय काल (बुधवारी) सायंकाळीच घेतला होता. आमदार निलेश लंके यांच्याशी अर्जुन भालेकर, चंद्रकांत चेडे यांनी चर्चा केल्यानंतर भालेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला साथ देण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात शहर विकास आघाडीचे दुसरे नवनिर्वाचित नगरसेवक भूषण उत्तम शेलार यांच्या यांच्यासोबत आमदार लंके यांची बैठक झाली होती. भालेकर तसेच श्री. शेलार यांनी आमदार लंके यांच्या समवेत सकारात्मक चर्चा करीत राष्ट्रवादी काँग्रेसला साथ देण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी सकाळी भालेकर व शेलार यांचे स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यानंतर आज दुपारी नगर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ७ तसेच शहर विकास आघाडीचे २ अशा नऊ सदस्यांची गट नोंदणी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात गट नोंदणी झाल्यानंतर शहर विकास आघाडीच्या दोन्ही नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगर येथील कार्यालयात हा सोहळा पार पडला.
यावेळी अर्जुन भालेकर, बाळासाहेब नगरे, बाळासाहेब मते, बबन चौरे, राहुल झावरे, जितेश सरडे, कारभारी पोटघन, संदीप चौधरी, बाळासाहेब लंके, सचिन औटी, डॉ. बाळासाहेब कावरे, अशोक घोडके, महेंद्र गायकवाड यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक सुरेखा भालेकर, भूषण शेलार, निता विजय औटी, नितीन अडसूळ, विजय सदाशिव औटी, सुप्रिया सुभाष शिंदे, हिमानी बाळासाहेब नगरे, डॉ. विद्या कावरे, प्रियांका औटी हे उपस्थित होते.
पाणी योजना व विविध कामांसाठी आमदार लंके यांना साथ शहराची पाणी योजना गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. योजना मार्गी लावण्यासाठी आमदार निलेश लंके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला. या योजनेचा प्रस्ताव राज्य शासनाकडे दाखल झाल्यानंतर अजितदादा यांनी योजनेसाठी निधी मंजुरीची घोषणा केली. शहरासाठी पाणी योजना हा जिव्हाळ्याचा विषय आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी निवडणुकीनंतर आम्ही आमदार लंके साहेबांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या पाच वर्षात त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विकास करु यासाठीच आम्ही राष्ट्रवादीला साथ दिल्याची भावना सुरेखा भालेकर व भूषण शेलार यांनी व्यक्त केली व्यक्त केली.
शहराचा विकास खुंटला
तब्बल पंधरा वर्षे आमदार असूनही पिण्याच्या पाणी योजनेचे कामही पूर्ण करू न शकणाऱ्या माजी आमदार विजयराव औटी यांना मतदारांनी नाकारले आहे. विकासासाठी शहर विकास आघाडी आता आम्ही आमदार लंके यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
from https://ift.tt/3AepSit