
बागायती क्षेत्र म्हटलं की मग नगदी पिकाची रेलचेल असणारच.ते इतरांनाही दिसतच.आपल्याकडे काय आहे हे इतरांना चांगलच माहित असतं.आपण कितीही कांगावा केला आणि जे नाही ते दाखवण्याचा प्रयत्न केला तरी सत्य लपत नाही. ते जगासमोर येतेच.पण या शरीररुपी बागायतात पेरलेलं पिक दुसऱ्याला कसं दिसेल?
संत शिरोमणी सावता महाराज म्हणतात,
आह्मा हातीं मोट नाडा ।
पाणी जातें फुलझाडा ॥२॥
महाराज म्हणतात आम्ही जी मोट हाकतोय ती हरिनामाची आहे. श्वासागणीक आमचं हरिनाम चालु आहे. हे हरिनामरुपी पाणी फुलझाडांना जातय.ती फुलझाडं कोणती आहेत?
शांति शेवंती फुलली ।
प्रेम जाई जुई व्याली ॥३॥
सावतानें केला मळा ।
विठ्ठल देखियला डोळा ॥४॥
या हरिनामाच्या पाण्याने शांतीरुपी शेवंती माझ्या शरीररुपी शेतीत फुलली आहे.आणि प्रेमरुपी जाईजुई सुद्धा फुलली आहे.
शेतात जाई,जुई,शेवंती फुलली तर त्याचा सुगंध किती दुरवर पसतो हे सांगण्याची गरज आहे का? मनुष्य आयुष्यभर शांती मिळवण्यासाठी झटत असतो.पण ते झटणं व्यर्थ ठरतं कारण ज्या ठिकाणी जमिनीत पाणीच नाही तेथे कितीही खोल विहीर खणली तरी पाणी लागणारच नाही. पण त्याने गेलेला समय पुन्हा आढता येणार नाही. झालेल्या शिण वेगळाच.हरिनाम हिच ती पाण्याची शिर आहे. त्या मोटेतुन आलेलं पाणी त्यापासुन फुललेली शेती म्हणजे शांती नावाचं अत्यंत महागडं पिक आहे. त्याबरोबर येणारं दुसरं पिक म्हणजे प्रेमरुपी फुललेली जाईजुई. शांती आणि प्रेम नावाचं पिक जर जोमदार आलं तर त्या शेतात विठ्ठल येऊन उभा रहाणारच.
तुकोबारायांनी म्हटलं,दया,क्षमा,शांती।तेथे देवाची वस्ती।। खरं तर हे सदगुण अंगात आले तर तेथे देवची वसती.असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. याच नामाच्या जोरावर सावता महाराजांनी मळा केला.कर्मप्रधान जीवन जगुन शाश्वत शेती फुलवलीआणि विठ्ठल प्राप्त केला.हाच या अभंगातला सिद्धांत आहे. आम्ही त्या वाटेने निघालो तर निश्चिंतीने विठ्ठल दर्शन होईल.
रामकृष्णहरी
from https://ift.tt/3nGtUv3