पारनेर : विद्यार्थीनींनी स्व-संरक्षणासाठी आवश्यक कौशल्य आत्मसात करावीत,असे आवाहन राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष राजेश्वरी कोठावळे यांनी केले.
पारनेर येथील किसान कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळ यांच्या अंतर्गत एकदिवसीय निर्भय कन्या अभियान कार्यशाळेप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य माधव घुटे उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती संस्था अध्यक्ष मा.चंद्रकांत चेडे होते. कार्यक्रमाचे उदघाटन दीपप्रज्वलन करून विद्यार्थी यांच्या स्वागत गीताने झाली.
यावेळी कोठावळे पुढे म्हणाल्या की आज महिलांनी कला, क्रीडा, साहित्य,विज्ञान, तंत्रज्ञान राजकारण, समाजकारण,अर्थकारण अशा विविध क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे,म्हणुन महिला या निर्भय झाल्या तरच खऱ्या अर्थाने देशाचा विकास साध्य होईल. शासनाने महिला सुरक्षेच्या दृष्टीने विविध कायदे केले आहेत. आज महिलांचे आर्थिक दृष्ट्या सबलीकरण होण्याचे प्रमाण व वेग कमी आहे. म्हणुन ही शक्ती समृद्ध व सशक्त बनविणे समाजाची जबाबदारी आहे.
यावेळी कोठावळे यांनी दैनंदिन जीवनात कार्यक्षमता वाढविण्यासाठी कराटे प्रशिक्षण दिले.अध्यक्षस्थानावरून बोलतांना प्राचार्य माधव घुटे म्हणाले,मुलींनी आपले स्वतःचे रक्षण कसे केले पाहिजे, वेळ प्रसंगी स्वतःचा बचाव कसा केला पाहिजे तसेच, कायदेविषयक बांधणीचे महत्त्व सांगितले.
चंद्रकांत चेडे म्हणाले की,विद्यार्थीनींनी भयमुक्त व स्वतःला निर्भय बनविण्याच्या दृष्टीकोनातून जीवनात चांगल्या मूल्यांचा अंगीकार करून चांगली जीवनशैली स्वीकारणे हे उद्दिष्ट असले पाहिजे.
यावेळी स्नेहा सोबले व भाग्यश्री येणारे या विद्यार्थीनींनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी मोठ्या संख्येने महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. शितल पाटील यांनी केले, सूत्रसंचालन प्रा.प्राजक्ता मंकले यांनी, तर आभार प्रदर्शन प्रा. अविनाश बर्डे यांनी केले.

from https://ift.tt/ZqErBtb

By News

Leave a Reply

Your email address will not be published.