
या सृष्टीतील सर्व गोष्टी या पंचमहाभूतापासूनच बनलेल्या आहेत.पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. पैकी आप (पाणी)या पंचमहाभूतांपासूनच आपल्या शरीरातील त्रिदोष म्हणजे वात, पित्त व कफ बनलेले आहेत. ज्याप्रमाणे माती आणि पाणी एकत्र केले की चिखलाचा एक गोळा तयार होतो त्याचप्रमाणे पृथ्वी आणि आप महाभूत एकत्र आले की शरीरातील कफ तयार होतो.
कफाचे आजार असणाऱ्यांनी पाणी कमी प्यायला हवे. तेजापासून पित्ताची निर्मिती होते तर वायू आणि आकाशापासून वाताची निर्मिती होते. आपल्या शरीरातील डोक्यापासून पायापर्यंत ही पंचमहाभूते अशी आहेत,चेहऱ्याच्या भागात कान, नाक,तोंड येथे आकाश तत्त्व आपल्याला अधिक पाहायला मिळते. छातीच्या ठिकाणी आत फुप्फुसांमध्ये वायू तत्त्वाचं प्राबल्य पाहायला मिळते,त्याखाली पोटाच्या ठिकाणी जिथे पचन प्रक्रिया घडते त्या ठिकाणी तेज(अग्नी) तत्त्व पाहायला मिळते. तर त्याखाली जिथे मूत्र साठते त्या ठिकाणी जल तत्त्व. आपल्या पायात पृथ्वी तत्त्वाचे प्राबल्य अधिक प्रमाणात पाहायला मिळते. म्हणूनच या पंचमहाभूतांचे शरीरातील संतुलन बिघडले की आपल्याला अनेक आजार निर्माण होताना दिसतात.
एका महाभूताच्या घरात दुसऱ्या महाभूताचे अतिक्रमण झाले की आजार निर्माण होणार. म्हणून शरीराच्या वरच्या भागात कफाचे, मधल्या भागात पित्ताचे व खालच्या भागात वाताचे आजार आपल्याला जास्त पाहायला मिळतात. उदाःसर्दी, खोकला हा कफ आजार वर सांगितलेल्या आकाश आणि वायू तत्वाच्या जागी पृथ्वी आणि जलतत्व आल्याने होतो. म्हणून पूर्वीच्या काळी सर्दी-खोकला झाला की फुटाणे खायचे. फुटाणे खाल्ल्याने वायू वाढतो. तसेच तो अधिक झालेल्या पाण्याला शोषून घेतो त्यामुळे सर्दी कमी होते.मूतखडा हा आप तत्वाच्या जागी पृथ्वीतत्व वाढल्याने होतो. म्हणून जुने लोक मूतखडा झाला की बिया असलेली फळे अथवा तत्सम पृथ्वी महाभूत अधिक असलेल्या गोष्टी कमी खायला सांगायचे.
अर्थात या पंचमहाभूतांचे योग्य संतुलन आपण निरोगी राहण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे.पंचकोशांच्या अभ्यासाने यावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे.आपण सध्या अभ्यासत असलेला मनोमयकोश समजण्यासाठी पंचमहाभुतांचं गणित पुन्हा नव्याने समजून घेत आहोत.यांच्या बिघाडामुळे मन संशयास्पद विचार सुरू करते कारण जाणीव म्हणजे संवेदना आणि मग वेदना तसा विचार करायला भाग पाडते.
मनाच्या स्वामित्वामुळे ज्ञानेंद्रियांच्या चलनवलनात बिघाड होतो.डोळ्यांनी काय पहावं हे डोळे ठरवत नाहीत, कानांनी काय ऐकावं हे कान ठरवत नाही, तोंडाने काय बोलावं,किंवा खावं हे तोंड ठरवत नाही,ते ठरवणारं मन आहे. मनाने विषय धारण केला की मग ते जी इच्छा करणार ती घातकच असणार.पंचप्राणांचं संतुलन बिघडण्याचं मुळ बहुतांश मनोमय कोशात सापडते.मनोमय कोश अत्यंत क्लिष्ट आहे. त्याचे शुद्धीकरण हे मोठे आव्हान असले तरी ते अशक्य नाही. त्याला योग्य वळणावर आणण्यासाठी काय केलं पाहिजे हे पुढील भागात पाहु.
रामकृष्णहरी
from https://ift.tt/yCb6mY3