
नगर : दरोडेखोर, लुटारूवाल्या कोळ्याच्या बायकोने जर ‘ मी तुमच्या पापात सहभागी आहे ‘, असं मतलबी उत्तर नवऱ्याला दिलं असतं तर, लुटारूवाल्याचा ‘ वाल्मिकी ॠषी ‘ झाला असता का? आणि मग रामायण कुणी लिहिले असते? असा प्रश्न उपस्थित करून, ‘ भारतातल्या सर्व गृहिणींनी वाल्या कोळ्याच्या बायकोचा आदर्श अवलंबिल्यास देशातला बोकाळलेला भ्रष्टाचार नक्की नाहीसा होईल ‘ असा रोखठोक विचार ज्येष्ठ साहित्यिक साहेबराव ठाणगे यांनी मांडला.
अहमदनगरच्या ‘ साहित्य अक्षर प्रकाशनतर्फे देण्यात येणारा, ‘ अक्षर वैभव पुरस्कार ‘ साहेबराव ठाणगे यांच्या ‘ चांगभलं ‘ या ललित लेख संग्रहासाठी देण्यात आला.पुरस्कार प्रदानप्रसंगी ते बोलत होते. शिरीष चिटणीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
ज्येष्ठ साहित्य संग्राहक शब्बीर भाई शेख यांच्या शुभहस्ते प्रतिष्ठेचा ‘ अक्षर वैभव ‘ पुरस्कार स्विकारल्यानंतर बोलताना साहेबराव ठाणगे यांनी वरील विचार मांडले. ते पुढे असे म्हणाले कि,आज आपल्या देशाला भ्रष्टाचार आणि अंधश्रध्देचा विनाशकारी विळखा पडला आहे. देशातून भ्रष्टाचार आणि अंधश्रध्देचे निर्मूलन केल्यास, देशाची प्रगती कोणीही थांबवू शकणार नाही. त्यासाठी कोट्यावधी रूपये खर्चून आणखी मंदीरे बांधण्याची काहीच गरज नाही असेही ठाणगे म्हणाले.
या कार्यक्रमात, पुंजाविहारी सुपेकर, आबासाहेब उमाप,डाॅ.सुधाकर शेलार, अनघा कारखानीस आणि अर्चना डावखर या साहित्यिकांनाही त्यांच्या साहित्यकृतीसाठी ‘ अक्षर वैभव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.सुरूवातीला, डाॅ. संजय बोरूडे संचलित ” आईपणाच्या कवितांचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला ज्यात जिल्यातील कवींनी आपल्या रचना सादर केल्या.
from Parner Darshan https://ift.tt/3pQpm78