
अहमदनगर : एकाच पदावर अखंडित १२ वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ वेतनश्रेणी चटोपाध्याय वेतनश्रेणीचा लाभ अनुज्ञेय असल्याचा शासन आदेश आहे. असे असतानाही येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या संबंधित लिपिकाच्या अज्ञानामुळे जिल्ह्यातील शिक्षक वरिष्ठ वेतनश्रेणीच्या लाभापासून वंचित असल्याने शिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा रोष असून या वरिष्ठ वेतनश्रेणी शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्राथमिक शिक्षक परिषद विभागाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे यांनी दिला आहे.
वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी पात्र शिक्षक कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव जिल्हा परिषद कार्यालयात मागील तब्बल दीड वर्षापासून धूळ खात पडलेले आहेत. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील कलम २४८ नुसार शिक्षक कर्मचाऱ्यांना एकाच पदावरील १२ वर्षांच्या अखंडित अर्हताकारी सेवेनंतर वरिष्ठ श्रेणीतील लाभ अनुज्ञेय आहे. तद्नुसार जिल्ह्यातील वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी पात्र शिक्षक कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव निकाली काढण्याची रास्त मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने अनेकदा निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .
प्रस्तावित प्रकरण जिल्हास्तरावर तपासणीसाठी एका पात्र कर्मचाऱ्यांसाठी ५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागत नाही. असे असतानाही केवळ एका लिपिकाच्या अज्ञानामुळे व दप्तर दिरंगाईमुळे वरिष्ठ वेतनश्रेणी निश्चितीसाठीचे प्रस्ताव सुमारे दीड वर्षापासून जिल्हास्तरावर सेवापुस्तिकांसह प्रस्ताव प्रलंबित ठेवणे, ही शासन आदेशाची अवहेलना आहे.या प्रकरणी कार्यक्षम शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून, संबंधित लिपिकास स्पष्ट निर्देश द्यावेत व तातडीने वरिष्ठ वेतनश्रेणीचे प्रस्ताव येत्या १५ दिवसात निकाली काढावेत अन्यथा शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे,कार्याध्यक्ष राम निकम, सरचिटणीस दत्ता गमे,आर.पी.रहाणे,संतोष खामकर,श्रीकृष्ण खेडकर,मिलिंद तनपुरे,संतोष खंडागळे,प्रल्हाद गजभिव, कल्याण राऊत,तुषार तुपे,गणपत सहाणे,सुभाष गरूड, मिनाक्षी तांबे,रवि कांबळे,दत्ता चोथे, बाळासाहेब मगर,सुहाग साबळे, आदींनी दिला आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागा मधील एका लिपिकाच्या अज्ञानामुळे व दप्तर दिरंगाईमुळे गेल्या दोन वर्षापासून वरिष्ठ वेतन श्रेणी पासून प्राथमिक शिक्षक वंचित आहेत या सर्व बाबींची सखोल चौकशी माननीय शिक्षणाधिकारी व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी करून लवकरात लवकर पात्र शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ द्यावा आंदोलनाबाबत चे निवेदन येत्या एक-दोन दिवसात जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात येणार आहे.
प्रवीण ठुबे
जिल्हाध्यक्ष, अहमदनगर जिल्हा शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग)
from https://ift.tt/3zKiJWF