लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी किशोर राजे निंबाळकर यांची निवड !

 

Table of Contents

सतीश डोंगरे
शिरूर : शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील भारतीय प्रशासन सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी किशोर राजे निंबाळकर यांची आज राज्यपालांच्या आदेशाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
न्हावरे ता. शिरूर येथील रहिवासी असलेले श्री. निंबाळकर यांनी बी. एस्सी. ऍग्रीकल्चरचे शिक्षण राहुरी विद्यापीठातून घेतले.त्यानंतर त्यांचे पदव्युत्तर शिक्षण पुणे येथे झाले. 1987 मध्ये त्यांची अक्कलकोट येथे तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली. अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांचे अन्नछत्र पूर्ण करण्यास त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सोलापूरला दोन वर्षे प्रांताधिकारी, नंतर पंढरपूरला प्रांताधिकारी म्हणून काम केले. पंढरपूर देवस्थानात अनेक चांगले बदल घडविले. मंदिराच्या गाभाऱ्यापासून दर्शनबारी, लाडूचा प्रसादवाटप, स्वच्छता, अन्नछत्र आदी विषयांत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पिंपरी चिंचवड (जि. पुणे) येथे जकात अधिकारी म्हणून काम केले.
माजी मंत्री विजयसिंह मोहिते- पाटील यांचे खासगी सचिव, नंतर ते उपमुख्यमंत्री झाल्यानंतर उपसचिव, सचिवपदावर काम केले. विधानसभेचे माजी अध्यक्ष सध्याचे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांचे सचिव म्हणून काम केले. राज्य सीमा दलाचा सहाय्यक आयुक्त म्हणून काम करताना 34 नवीन नाकाबंदी ठाणी सुरू केली. ठाणे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना ठाणे जिल्हा हागणदारीमुक्त केला. चार महिन्यांत जिल्ह्यात बावीस हजार शौचालये बांधली. “पेसा’ कायद्यांतर्गत 533 पाड्यांचे रूपांतर गावात करून सोयी-सुविधा दिल्या.
लोकसहभागातून डिजिटल शाळा केल्या. त्यानंतर जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून ही त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली.

न्हावरे या आपल्या गावाच्या जडणघडणीतही त्यांचा मोठा वाटा आहे. न्हावरे फाटा येथे जलद – अतिजलद एसटी बस थांबवाव्यात यासाठी त्यांनी पत्रव्यवहार करुन हा प्रश्न मार्गी लावला आहे. न्हावरे गावासाठी पीएमपीएमएलची बससेवा सुरू व्हावी यासाठीही त्यांचाच पुढाकार होता.
त्यांच्या या निवडीमुळे तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

from https://ift.tt/3CTfhJp

Leave a Comment

error: Content is protected !!