
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे करोनामुक्त झाले असून त्यांच्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. राज यांची आई कुंदाताई तसेच बहिणीनेही कोरोनावर मात केली आहे. याबाबत डॉ. जलील परकार यांनी माहिती दिली आहे.
राज ठाकरे यांना कोरोना संसर्गाची लागण झाल्याचे २३ ऑक्टोबर रोजी स्पष्ट झाले होते. त्यानंतर वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात त्यांनी उपचार घेतले होते. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. त्यानंतर ते होम क्वारंटाइन होते. दरम्यान, राज यांची कोरोना चाचणी करण्यात आली असता त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
राज यांच्यासोबतच त्यांची आई कुंदाताई ठाकरे आणि राज यांची बहीण जयवंती देशपांडे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांनीही कोरोनावर मात केली आहे. मुख्य म्हणजे राज, त्यांची आई आणि बहीण या तिघांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यानंतरही त्यांना कोरोनाची लागण झाली होती. राज याचे पुत्र अमित ठाकरे यांना एप्रिल महिन्यात करोनाची लागण झाली होती. त्यांच्यावरही लीलावती रुग्णालयातच उपचार करण्यात आले होते.
दरम्यान, राज्यात येत्या काळात प्रमुख महापालिकांच्या निवडणुका असल्याने इतर पक्षांप्रमाणे मनसेनेही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी राज ठाकरे यांनी बैठकांचा धडाका लावला होता. मात्र, मुंबई आणि पुण्यातील मनसेचे मेळावे अचानक रद्द करण्यात आले होते. २३ आणि २४ ऑक्टोबर रोजी हे मेळावे होणार होते. राज यांच्या तब्येतीच्या कारणास्तव हे मेळावे रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर राज यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती.
from Parner Darshan https://ift.tt/3BrR9N9