युवकांनी ज्ञानेश्वरी वाचायलाच हवी!

Table of Contents

अध्यात्मिक जीवन वयपरत्वे स्विकारु असा बरेचदा जगण्याचा कल आहे.तारुण्यात त्याची काही गरज नसावी असा सर्वसाधारण होरा आहेच.वडिलोपार्जित खूप काही साठवलेलं असेल तर अशा गोष्टी डोक्यात सुद्धा येणार नाहीत.कारण यातायात रहात नाही,झुंजावं लागत नाही, अस्तित्वाची लढाई करावी लागतच नाही.ते आपोआपच तयार झालेलं असतं.अर्थात यालाही अपवादात्मक अध्यात्मिक जीवन जगणारे गर्भश्रीमंतही माझ्या स्नेहयादीत आहेत.
कर्माचा ठसा उमटवायचा म्हटलं तर आयुष्य पणाला लावावं लागतं.आयत्या पिठावर रेघोट्या ओढुनही ठसा निर्माण होतो.लोकमान्यता देतात.पण आंतरमन ते मान्य करीत नाही. त्यानं काही निर्माण केल्याचा आनंद मिळतच नाही.आणि वेगळं काही करण्याचा कणाच नसल्याने बहुदा बीजात वृक्ष लपुन रहावा तसं ते जीवन असतं.
युवकांनी स्वतःला स्वतःच्या पायावर उभ्या केलेल्या विचारांवर सिध्द करायला हवं.शिवाय नैष्कर्मवाद स्विकारुन ते करता यायला हवं.मी हे अमुक केलं हे बोलावं लागतच.ते बोलावं लागणारच आहे.पण त्यात तो डोकावला की अधोगती सुरू होते.तो म्हणजे ‘मीपणा’.
जवळ आलेली माणसं यामुळे दुर जातात.चांगल्या कामात खोडा पडतो.एखादं सुंदर झाड डवरलय आणि त्याला मोहोरही चांगला आलाय.आता त्याला विपुल प्रमाणात फळं येणार हे त्रयस्थही सांगु शकतो.पण त्यावर जर रोग पडला तर? मनुष्यक्रांतीही अशीच आहे.ती निकोप होण्यासाठी काय केलं पाहिजे याचं यथार्थ मार्गदर्शन ज्ञानेश्वरी साधकाला करते.
माऊली म्हणतात,
आणि उदोअस्तुचेनि प्रमाणें । जैसें न चालतां सूर्याचें चालणें ।
तैसें नैष्कर्म्यत्व जाणें । कर्मींचि असतां ॥९९॥
आणि सूर्य उदय व अस्त पावतो, या एका प्रमाणावरून तो चाललेला भासतो, पण वास्तविक तो चालत नाही, त्याप्रमाणे तो कर्माचरण करीत असताही आपले नैष्कर्म्य जाणतो. ॥९९॥
ही ओवी तुम्हाला विज्ञानाची चुणुक दाखवते.
बाराव्या शतकात माऊलींनी असं म्हटलं की आपण अनेकदा म्हणतो, सुर्य उगवला,तो मध्यावर आला,तो मावळला.पण प्रत्यक्षात सुर्य चालतच नाही. पृथ्वीच्या परिवलन गतीने सुर्य चालल्याचा भास होतो हे विज्ञान माऊलींनी कोणत्या प्रयोगशाळेत शोधलं?हा एक प्रश्न तुम्हाला ज्ञानेश्वरीच्या प्रेमात पाडील.पण तुमची नजर अभ्यासु असली पाहिजे.अशा कितीतरी विस्मित करणाऱ्या ओव्या ज्ञानेश्वरीत आहेत.शाश्वत सत्य जीवन जगण्याची किमया ज्ञानेश्वरी शिकवते.कर्म करुनही त्याची बाधा होणार नाही हे तंत्र ज्ञानेश्वरी शिकवते. म्हणून तरूणांनो एकदाच वाचा पण समजून वाचा.
रामकृष्णहरी

from https://ift.tt/3KfZjxY

Leave a Comment

error: Content is protected !!