
सांगली : महाराष्ट्रात एक असे गाव आहे, जिथे एक दिवस नव्हे तर 365 दिवस राष्ट्रगीत वाजते. हे गाव आहे सांगली जिल्ह्यातील भिलवडी. गावातील गावकऱ्यांनी प्रबळ इच्छाशक्ती, दृढनिश्चय आणि दृढ संकल्प असेल तर काय-काय होऊ शकते, हे सिद्ध केले आहे. म्हणूनच या गावात दररोज सकाळी न चुकता राष्ट्रगीत वाजते.
अशाप्रकारे रोज राष्ट्रगीत वाजवणारे भिलवडी हे देशातील सहावे आणि महाराष्ट्रातील पहिलेच गाव ठरले आहे. गावातील व्यापारी संघटनेने सुरु केलेली राष्ट्रगीताची परंपरा गेल्या दोन वर्षांपासून अखंडीतपणे सुरु आहे. रोज सकाळी दिनविशेष तसेच त्यावर आधारित एक प्रेरणादायी गाणे गावामध्ये वाजवले जाते. बरोबर 9 वाजून 10 मिनिटांनी राष्ट्गीत वाजवले जाते. हे राष्ट्रगीत व्यापारी संघटनेच्या पब्लिक ऍड्रेस सिस्टिमवरून लावले जाते. त्याचा सर्व व्यापारी आणि ग्रामस्थ मान राखतात. गावात राष्ट्रगीत नियमितपणे ऐकायला मिळाले, तर गावच देशासारखे भासू लागते, असे गावकरी आवर्जून सांगतात.
या गावामध्ये 15 ऑगस्ट 2020 पासून राष्ट्रगीत दररोज वाजवण्यास सुरुवात केली. तेव्हा काहींना वाटले की हा उत्साह काही दिवसांत कमी होईल. पण त्यांचे निष्कर्ष खोटे ठरले. हे काम मागील अडीच वर्षांपासून अविरत सुरु आहे. जेव्हा गावात राष्ट्रगीत वाजते तेव्हा वाहतूक थांबते, विविध वाहनांतील नागरिक राष्ट्रगीतासाठी खाली उतरतात. महाराष्ट्रातील या छोट्याशा गावाने सकारात्मक संदेश दिल्याचे व्यापारी संघटनेचे सभासद असणाऱ्या दीपक पाटील यांनी अभिमानाने सांगितले.
from https://ift.tt/3nYPAmi