
पुणे : कोरोनाच्या रूग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याचा विचार करुन पुणे जिल्ह्यातील मावळ आणि आंबेगाव तालुक्यातील बैलगाडा शर्यती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काल (शुक्रवारी) रात्री उशीरा जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी हा निर्णय घेतला आहे. काल रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्ससोबत बैठक झाली त्यानंतर बैलगाडा शर्यत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. मात्र, या निर्णयावर शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पुणे जिल्ह्यातील मावळ आणि आंबेगाव तालुक्यात आज (शनिवारी ) नववर्षाच्या प्रारंभी बैलगाडा शर्यती होणार होत्या. मात्र, ऐनवेळेस या शर्यती रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांकडून घेण्यात आलाय. मात्र, शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
याविषयी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढळराव पाटील यांना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील टास्क फोर्सने हा निर्णय घेतल्याची आठवण करून दिली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करुन व बैलगाडामालक व बैलगाडाप्रेमी यांच्या भावनांचा आदर ठेवत 1 जानेवारी 2022 रोजी होणारी बैलगाडा शर्यत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पवार यांनी सांगितले.
कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी चिचोडी- आंबेगाव आणि नानोलीतर्फे चाकण (ता. मावळ) येथील बैलगाडा शर्यतीची परवानगी पुढील आदेश येईपर्यंत स्थगित ठेवण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आदेश दिले आहेत.
from https://ift.tt/3mHRaIv