मुलं म्हणजे देवा घरची फुलं.अशी गोड वाक्य आपण नेहमी एकतो.पण मुलांना फुलाइतकं कोमल ठेवणं किती काळ गरजेचं आहे?त्याचं उत्तर म्हणजे कळते होईपर्यंत. त्यानंतर मात्र त्यांना घडवण्यासाठी यथायोग्य वळण लावता आले पाहिजे. कारण कोवळ्या वयातच संस्काराचा पाया पक्का होत असतो.त्यात थोरामोठ्यांचा आदर करण्याचा संस्कार हा सर्वांत उच्च संस्कार आहे.

लहान वयात मुलांचे भरपूर लाड व्हावेत.पण जसजशी मुलं कळती होत जातात तसतशी लाडाची जागा शिस्तीत परावर्तित व्हायला हवी.कारण बालहट्ट पुरवण्यात तोपर्यंत आनंद आहे जोपर्यंत ते मुल अज्ञान आहे. ज्ञान देण्याची व्यवस्थाही प्रेमातच आहे हे लक्षात घेऊनच संस्कार व्हायला हवेत.मुलांचा कल ओळखता येणं आणि त्यानुसार त्याला घडवण्यासाठी प्रयत्न करणे हे जागृक पालकांचे लक्षण आहे. आपल्या इच्छेनुसार मुलांना घडवण्याचा खटाटोप अनेक पालक करतात.काही यशस्वी होतात.पण अशी मुलं बहुदा पैसा कमावण्याची मशीन होण्याची दाट शक्यता असते.
मुलांना भावना व्यक्त करण्याची कला प्राप्त करुन देण्याइतका सुज्ञपणा पालकांमधे यायला हवा.अनेकांच्या बाबतीत असं होतं की मला नेमकं काय करण्याची इच्छा होती हेच कळालं नाही,जेव्हा जाणीव झाली तेव्हा वय निघुन गेलं होतं.जीवन फसल्याचा शोध जीवनाच्या अंतिम टप्प्यात लागला तर पश्चाताप सोडुन काहीच करता येत नाही. प्रत्येक जीव आपलं सामर्थ्य घेऊन आलेला आहे. पण त्याला व्यक्त होण्यासाठी विपरीत परिस्थिती निर्माण व्हावी लागते.शेतातील पिक चांगलं येण्यासाठी त्याला पाण्याचा पुरवठा कमी करुन ताण दिला जातो.मगच ते जमिनीत आपली मुळं घट्ट रोवण्याचा प्रयत्न करतं.पिकाला वाऱ्या वावधानात उभं रहाण्याचं बळ त्या ताणामुळे मिळतं.
आपण मुलांना सुविधेत न्हावु घालत असाल तर ते विपरीत परिस्थिती सहन करु शकणार नाही. बदाम पिस्त्याने बौद्धिक विकास होतो हे तितकसं खरं नसावं.कारण आजपर्यंत ज्यांनी जगाच्या इतिहासात आपलं नाव अजरामर केलं त्या महापुरुषांचा इतिहास असुविधांनी भरलेला आहे.आधी जगण्यासाठीच त्यांना झुंजावं लागलेलं आहे. अनेकांनी सुविधा असुनही त्याचा त्याग केला आहे.अग्नि प्रगट होण्यासाठी लाकडाला जळावं लागतं.पाणी तप्त होण्यासाठी त्याला अग्नीदिव्य करालं लागतं.दूधाला तुप होण्यासाठी करावं लागतं ते सहज नाही.
आपली मुलं तावूनसुलाखून निघाल्याशिवाय ती या जगात व्यक्त होऊ शकणार नाहीत,हे ज्या पालकांना कळेल ते धन्य.
तुकोबाराय म्हणतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक। हे सात्विकपण कुळात असल्याशिवाय पुढे ते प्रगट होत नाही हा गाभा आपल्या ध्यानात असला पाहिजे.
सात्विकपण म्हणजे माणुस म्हणून जगण्यासाठी सिद्ध असलेला जीव.माणुसपण हरवून जे काही करालं त्यानं सर्वांना दुःखाची भेट मिळते.आपली मुलं माणुसपण सोबत घेऊन मोठी करणं हे आव्हान नाहीच.मोठेपणाची हाव आडवी येणार नाही याची काळजी घेणं हेच मोठं आव्हान आहे. लहानपण देगा देवा,हे वाक्य मोठेपण आल्यानंतर लक्षात राहिलं की मग सगळं अलबेल होईल.
रामकृष्णहरी

from https://ift.tt/hwVBdtK

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *