माशाने पाण्याचा त्याग केला तर मृत्यू निश्चित आहे !

Table of Contents

मनुष्याचे जीवन कर्मप्रधान असले पाहिजे.कर्मत्यागाने मनुष्य जीवनाचा विनाश निश्चित ठरलेला आहे. असेल हरी तर देईल खाटल्यावरी या भावनेने अनेकजन दारिद्र्यात खितपत पडतात.शिवाय लौकिक आणि अलौकिक असं काहीही वाट्याला येत नाही. आपण पाळलेला कुत्रा सुद्धा इमानेइतबारे मालकाची चाकरी करतो.तो आपला स्वधर्म जाणतो.पण मनुष्याकडे सतसद्विवेक असुनही त्याला त्याचे भान रहात नाही.
दैववादी झाल्यावर कर्तव्य समाप्त होते.मग ते जीवन मृतवतच आहे. अर्जुनाच्या मनात युद्धभूमीवर स्वधर्म त्यागण्याचा विचार आल्याने भगवान श्रीकृष्ण त्याला स्वधर्माची आठवण करुन देताना म्हणतात,

जैसे जळचरा जळ सांडे । आणि तत्क्षणीं मरण मांडे ।हा स्वधर्मु तेणें पाडें । विसंबों नये ॥ ११७ ॥
ज्याप्रमाणे माशांना पाण्याचा वियोग झाला की त्याच क्षणी मरण येते (म्हणून माशाने पाण्याचा त्याग करू नये), त्याप्रमाणे स्वधर्माचरणाच्या त्यागाने मनुष्याचा नाश होतो. म्हणून त्याने ह्या स्वधर्माचरणाला विसरू नये.
म्हणौनि तुम्हीं समस्तीं । आपुलालिया कर्मीं उचितीं ।निरत व्हावें पुढत पुढती । म्हणिपत असे ॥ ११८ ॥
म्हणून तुम्ही सर्वांनी आपापल्या विहित कर्माचरणामधे तत्पर असावे हेच आमचे वारंवार सांगणे आहे,असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत, इथं निमित्त अर्जुन आहे, पण सांगणं समस्त मानव जातीला आहे.क्षत्रिय म्हणून तुम्ही जगत असाल तर कोणत्याही क्षणी तो धर्म पाळलाच पाहिजे.धनुष्य रथात ठेवून अर्जुन खाली उतरला.कारण युद्धाचं कारण तो विसरला.युद्ध कुणाशी करावे? तर त्याचं अत्यंत सोपं उत्तर आहे,की अन्यायाविरुद्ध युद्ध करावं.अन्यायाला नाते नसते.अन्याय करणारी व्यक्ती, समुह कोण आहे?,हा प्रश्न निर्माण होता कामा नये.लौकिक जगतात वाट्याला आलेलं कर्म म्हणजेच स्वधर्म आहे हे अर्जुनाला भगवंत वारंवार सांगत आहेत.
रोहिदास महाराजांचा चप्पल व्यवसाय होता.कातडी रंगवायला भगवंत मदत करायचे.
चर्म रंगु लागे रोहिदासा संगी।
कबिराचे मागें शेले विणी।।
कबिर महाराजांना सुद्धा शेले विणु लागत.
सज्जन कसायाचा स्वधर्म मांसविक्री होता.भगवतसेवा करताना त्याने त्याचा त्याग केला नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. सज्जन कसायाला स्वतः पांडुरंग परमात्मा मांस विकु लागले हे त्याचं अत्यंत तिक्ष्ण आणि पराकोटीचं उदाहरण आहे.
सज्जन कसाया विकु लागे मांस।
मळा सावत्यास खुरपु लागे।।
सावता महाराजांनाही शेतीत मदत करण्याचे काम भगवंत करतात. मग आपणच का त्याला विरुद्ध ठरवत आहोत?
कर्म आणि धर्माची गल्लत आपल्याकडुन नेहमी होते.आपण भक्ती,धर्म,कर्म वेगवेगळ्या तराजुत तोलतो.त्याच गोष्टी आपल्याला स्वधर्माचे पालन करण्यापासून दुर नेतात.आत्मचिंतनाने याचा बोध होतो.मग आपल्या वाट्याला आलेलं कर्म करण्यात कमीपण अथवा संकोच वाटत नाही.
रामकृष्णहरी

from https://ift.tt/BJOieR6

Leave a Comment

error: Content is protected !!