भाळवणीच्या प्राथमिक शाळा खोल्यांसाठी 36 लाखांचा निधी !

 

Table of Contents

पारनेर : तालुक्यातील भाळवणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सुमारे 36 लाख रुपयांच्या चार शाळा खोल्यांना मंजुरी मिळाली असून लवकरच प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ होणार असल्याची माहिती सरपंच लिलाताई रोहोकले यांनी दिली.
भाळवणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांची इमारत जीर्ण झाल्याने काही दिवसांपूर्वीच पावसाळ्यात ही इमारत कोसळली होती सुदैवाने शाळेला सुट्टी असल्याने मोठी दुर्घटना टळली होती. यामुळे ही जीर्ण इमारत पाडण्यात आली आहे. त्यामुळे शाळा इतरत्र भरत आहे. या ठिकाणी नवीन इमारत होण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती प्रताप पाटील शेळके, बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते व जिल्हा परिषद सदस्य सुप्रियाताई झावरे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रत्येकी आठ लाख 75 हजार रुपयांच्या 3 तर दहा लाख रुपयांच्या एका शाळेच्या खोलीला प्रशासकीय मान्यता मिळाली असून यासंबंधीचा कार्यारंभ आदेशही प्राप्त झाला आहे.या आठवड्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती उपसरपंच संदीप ठुबे यांनी दिली. शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास रोहोकले यांनी या शाळा खोल्यांसाठी विशेष पाठपुरावा केला होता.
ग्रामस्थ व स्थानिक शाळा समितीच्या वतीने नवीन शाळा खोल्यांच्या इमारतीची मागणी करण्यात आली होती.यानुसार जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळा खोल्यांना निधी प्राप्त करून दिल्यामुळे विद्यार्थ्यांना सुविधा निर्माण होणार आहे. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळा खोल्यांचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र गोविंदराव चेमटे,उपाध्यक्ष सुभाष संभाजी रोहोकले यांनी पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

from Parner Darshan https://ift.tt/3murVcI

Leave a Comment

error: Content is protected !!