
पारनेर : तालुक्यातील भाळवणी हे राजकीयदृष्ट्या तसेच लोकसंख्येने मोठे गाव असूनही या गावाला आत्तापर्यंत जिल्हा परिषदेत संधी मिळाली नसल्याची खंत व्यक्त करतानाच मागील जिल्हा परिषद निवडणुकीत झालेली ‘ती’ चूक या निवडणुकीत तरी दुरुस्त करा असा सल्ला जिल्हा परिषदेच्या बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते यांनी दिला.
तालुक्यातील भाळवणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सुमारे 35 लाख रुपयांच्या चार शाळा खोल्यांचा भुमीपूजन जिल्हा परिषदेच्या बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते यांच्या हस्ते आज संपन्न झाला. या प्रसंगी श्री. दाते बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब तांबे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, तालुकाप्रमुख विकास रोहोकले, पंचायत समिती सदस्या ताराबाई चौधरी, सरपंच लिलाताई रोहोकले यावेळी उपस्थित होते.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास रोहोकले यांना आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी देऊन पदाची संधी देण्याची मागणी या समारंभात उपस्थितांनी केली, याचा धागा पकडत जिल्हा परिषदेचे सभापती काशिनाथ दाते यांनी गेल्या वेळेसही रोहोकले यांच्या मातोश्रींना उमेदवारीची संधी दिली होती परंतु भाळवणीकरांनी ती संधी गमावल्याचे सांगत या निवडणुकीत तरी मागील चूक करू नका असा सल्लाही त्यांनी दिला.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम समिती सभापती पदाच्या माध्यमातून केवळ टाकळी ढोकेश्वर गटातच नाही तर तालुक्यातील गावोगावी विकास कामे केले असून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम केल्याचे सांगत श्री. दाते म्हणाले कि, माजी आमदार विजयराव औटी यांच्या नेतृत्वाखाली आमचे काम सुरू आहे. आम्ही केवळ भूमीपूजनाचे बोर्डच लावत नाही तर प्रत्यक्षात कामे सुरू करतो असे सांगत श्री.दाते यांनी विरोधकांना अप्रत्यक्ष टोला लगावला.
भाळवणी येथील चार शाळा खोल्यांसाठी निधी उपलब्ध करुन दिला असून उर्वरित आवश्यक असणाऱ्या दोन शाळा खोल्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगत पदाच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांची पावती आगामी निवडणुकीत मतदार शिवसेनेला देणार असल्याचा विश्वास श्री. दाते यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविक उपसरपंच संदीप ठुबे यांनी केले. यावेळी शिक्षक संघाचे राज्य नेते रावसाहेब रोहोकले, माजी सरपंच बबन चेमटे, ठकचंद रोहोकले,गंगाधर रोहोकले,मुख्याध्यापक श्रीपती आबुज, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र गोविंदराव चेमटे, माजी अध्यक्ष संतोष चेमटे, उपाध्यक्ष सुभाष संभाजी रोहोकले,आप्पादादा रोहोकले, डॉ.किसनराव भनगडे, बी.वाय.रोहोकले,ग्रामविकास अधिकारी कुंडलिक भगत आदी यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राथमिक शिक्षक बबनराव मते यांनी केले तर बबनराव डावखर यांनी आभार मानले.
from https://ift.tt/3I6tcQn