
एकच सण संपूर्ण देशात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. होळीच्या देशातील वेगवेगळ्या परंपरा आणि पद्धती जाणून तुम्ही अचंबित व्हाल, त्याबद्दल अधिक सविस्तर जाणून घेऊयात…
● महाराष्ट्र : महाराष्ट्रात होळीच्या दिवशी वर्गणी गोळा करून गोवऱ्या, लाकडं, एरंडाची फांदी, ऊस यांची होळी उभारली जाते. याला पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो. नारळ फोडला जातो आणि नंतर तिचं दहन केलं जातं. दरम्यान होळीमध्ये सर्व दुर्गुण जळून जावे अशी सगळेजण प्रार्थना करतात. होळी पेटवल्यावर बोंबा मारण्याची प्रथा आहे. दरम्यान दुसरा दिवस धुळवडीचा किंवा धुलिवंदनाचा असतो. या दिवशी होळीच्या राखेने एकमेकांना रंगवलं जातं. पाण्याने धुळवड साजरी केली जाते. तर महाराष्ट्रात वसंत पंचमीच्या दिवशी रंगपंचमी साजरी होते त्यामध्ये विविध रंग, पिचकाऱ्या वापरून रंगांच्या पाण्याने होळी खेळली जाते.
● आसाम : येथे होळीला फाकुवा म्हणतात. ती दोन दिवस असते. पहिल्या फाकुवा या दिवशी पौराणिक कथेतील होलिका राक्षसीचं प्रतीक म्हणून मातीच्या झोपड्यांचं दहन करतात. दुसऱ्या दिवसाला डोउल म्हणतात त्या दिवशी एकमेकांना रंग लावून तो दिवस साजरा करतात.
● गोवा : येथे होळीला उक्कुली म्हणतात. ती वसंतोत्सवाच्या स्वरूपात साजरी करतात. संपूर्ण महिनाभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. याला होळीचा शिमगो म्हणजे शिमगाही असेही म्हणतात.
● गुजरात : येथील अहमदाबादमध्ये जागोजागी दहिहंडी बांधली जाते. तरुण मुलं ती फोडून त्यातलं ताक, दही, लोणी प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटतात. गुजरातेत त्याला धुलेती असे म्हणतात.
● उत्तर प्रदेश : येथे लठमार होळी खेळली जाते. लठमार म्हणजे काठीने मारणे. येथे पत्नी आपल्या पतीला खेळ म्हणून काठीने मारतात आणि पती लाकडी ढालीनी स्वत:चा बचाव करतो. यालाही एक पौराणिक आधार आहे.
● कर्नाटक : येथे होळीच्या आधी 5 दिवस पारंपरिक नृत्य करून होळीचा सण साजरा होतो त्याला बेदारा वेश असे म्हटले जाते.
● पंजाब : येथे तीन दिवस होल्ला मोहल्ला हा सण होळीच्या दरम्यान साजरा केला जातो. यात निहंग शिखांना पारंपरिक युद्ध कला शिकवली जाते. ही परंपरा दहावे शीख गुरू गोविंदसिंगांनी सुरू केली होती.
● पश्चिम बंगाल : येथे वसंतोत्सव म्हणून होळी साजरी केली जाते. श्रीराधाकृष्णाच्या मूर्तींची सजावट करून त्यांची मिरवणूक काढली जाते. त्याला डोल जत्रा म्हणतात.
● मणिपूर : येथे पाखांगबा या स्थानिक देवाची पूजा केली जाते. दरम्यान होळीसाठी वर्गणी काढून त्यातून होलिका राक्षसीचं प्रतीक म्हणून मातीच्या झोपड्या तयार करून दहन केलं जातं. यानंतर पाच दिवसांचा क्रीडा महोत्सव होतो. त्याला याओसांग असे म्हणतात.
from https://ift.tt/W2caqyf