
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून कोरोना रुग्णसंख्येचा घटत चाललेल्या आकडेवारीचा आलेख आता पुन्हा वर जाऊ लागला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठया प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या डेल्टा विषाणूसह, ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्याही वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील मंत्रिमंडाळातील काही मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती.
राज्यातील 10 मंत्री आणि 20 आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. “जर यापुढेही राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत राहीली तर राज्य सरकार आणखी कठोर निर्बंध घालू शकते,” असे संकेतही पवार यांनी दिले.
“अधिवेशनाच्या कालावधीत केवळ पाच दिवसांमध्ये १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. कालच राज्य सरकारने कोरोनाची नवी नियमावली जाहीर केली आहे.लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी नियमांचे भान ठेवले पाहिजे,” असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.
”दुसऱ्या लाटेची किंमत मोजलीये”
प्रत्येकाला कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरे व्हावे असे वाटतेय. पण नव्याने आलेला कोरोनाचा व्हेरिअंट वेगाने पसरत आहे. अमेरिका फ्रान्स, इंग्लंड येथे दररोज लाखो रुग्ण सापडत आहे. आपण दुसऱ्या लाटेची मोठी किंमतही मोजली आहे. प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी सरकारही प्रयत्न करीत आहे. आत्ताचे नियम कडक का असा आग्रह करु नये, सर्वांनी सहकार्य करावे,” असेही पवार म्हणाले.
from https://ift.tt/3mMRq96