
आपण जीवन जगतो का?
भलताच प्रश्न वाटतोय ना ?
“भावना” निसर्गानं दिलेली एक श्रेष्ठ अवस्था.
मात्र ती प्रत्येकाला जपता येईलच असं नाही. संतांचं,महापुरुषांचं अवघं जीवन सद्भावानं प्रधान होतं.त्यातही ती “सद्भावना”.
भावनाशून्य माणसं यंत्रवत होतात.पैसा कमावण्याची मशिन बनतात.
आपण जीवन का जगतो?
हा प्रश्न भावनाशून्य माणसांना पडतोच.पण जीवनाच्या अखेरच्या टप्प्यात. कारण तेव्हा शरीराची कार्यशक्ती थंडावलेली असते.पैसा कमावण्यात मर,मर आयुष्य घालवलेलं असतं.पैसा असतो पण प्रेमाचे शब्द कानावर पडावेत,कुणीतरी माझ्याशी प्रेमानं बोलावं असं सारखं वाटत असतं.पण भावना व्यक्त कधी केल्याच नाहीत.
जिथं भावना व्यक्त होत नाहीत, तिथं प्रेमाचा संबंध येतोच कुठे?अनेक सुज्ञ व्यक्ती कुटुंबातील व्यक्तींच्या भौतिक गरजा पुर्ण करण्यालाच प्रपंच म्हणतात. आईवडील, बायको, मुलं यांच्या भावना कधी ते तपासतच नाहीत. मग नात्यांमधे प्रेमाची गुंफन होणारच कशी?
आईवडीलांना साऱ्या सुखसुविधा नाही देऊ शकलात तरी चालेल. पण त्यांच्या चरणावर डोकं टेकवायला विसरु नका,दोन शब्द बोला!पण त्यात प्रेमाची भावना असायला हवी.
कोणत्या स्रीला दागिन्यांची हाव नाही? पण पतीनं दहा रुपयांचा फुलांचा गजरा आणून तिच्या केसांत माळला की नवलख्खा हार परिधान केल्याचा आनंद तिला होतो.ही भावना जपणं म्हणजे जीवन आहे. आणि मुलांमध्ये प्रेमभावना जागृत करु शकलात तर उत्तरार्धात मुलांकडून परतफेड होईल.
म्हणुन स्वतः भावनाप्रधान न होता इतरांच्या भावनेला प्रधान स्थान द्या.
अनेक निराधार आईबाबांची मनं मी वाचली.त्यात बहुतांश स्वतः तेच या परिस्थितीला जबाबदार धरताहेत.एक बाबा म्हणाले,आयुष्यभर मुलांसाठी कमावत राहिलो, पण प्रेमसंस्कार द्यायचं विसरून गेलो.घर स्वच्छ करताना कचरा बाहेर टाकावा असं दोनही मुलांनी मला घराबाहेर टाकलं.याला मीच जबाबदार आहे. युवकांनो तुमच्याही जीवनात ही सारी स्थित्यंतरं येणारच आहेत. आत्तापासूनच यावर काम केलत तर परिपक्वतेचा आनंद घेता येईल.
तुकोबाराय म्हणतात, पिकलिया शेंदे कडूपण गेले।तैसे आम्हा केले पांडुंरंगे।। शेंद नावाचं फळ कच्च असताना ते अत्यंत कडु असतं.त्याला हात लावला तरी हाताचा कडु वास लवकर जात नाही.पण ते पिकल्यावर त्याचा सुंगध लांबवर पसरतो.आता शेंदफळ कित्येकांना पहायलाही मिळालं नसेल. पण कैरी मात्र सर्वांच्या परिचयाची आहे.आंबट कैरी परिपक्व झाल्यावर त्याचं गोड आंब्यात रुपांतर होतं.असं आपल्या आयुष्यात झालं तर जीवन सार्थकी लागलं असं म्हणता येईल.
रामकृष्णहरी
from https://ift.tt/3nuOONs