
पारनेर : तालुक्यात थंडीची लाट मोठ्या प्रमाणात असून पुढील दाेन-चार दिवस थंडी तीव्र राहण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शनही होत नाही.त्यामुळे थंडीची तीव्रता अधिक जाणवेल, असे हवामान अभ्यासकांचे म्हणणे आहे. पारनेरचे आज किमान तापमान १३अंश सेल्सिअस नाेंदवले गेले आहे. नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी रात्रीबराेबर सकाळी देखील शेकाेटीचा आधार घेतला आहे.
पारनेर तालुक्यात तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण झाले आहे. आज धुक्याची चादर हाेती. त्यामुळे सर्वत्र गारवा हाेता. या गारव्यामुळे दिवसभर जनजीवन विस्कळीत झाले हाेते. नागरिकांनी दाेन दिवसांपासून गरम कपड्यांचा आधार घेतला आहे. व्यवहारांवर परिणाम झाला आहे. गारवा, ढगाळ वातावरण यामुळे सर्दी, खाेकला, ज्वराचे रुग्ण वाढले आहेत. त्यातच काेराेना रुग्ण संख्या वाढल्याने काहीसे चिंतेचे वातावरण आहे. याशिवाय मागील काही दिवसापासून ढगाळ वातावरण व धुकं पडत असल्यामुळे ऐन मोसमात असलेल्या हरबरा, गहू, कांदा आणि भाजीपाला पिकांवर या धुक्याचा परिणाम होणार असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात घट नाेंदवली गेली आहे. आज कमाल तापमान २४ अंश सेल्सिअस एवढे नाेंदवले गेले. तीन दिवसापूर्वी हेच कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस एवढे हाेते. सुमारे सहा अंशाची घसरण कमाल तापमानात नाेंदवली गेली आहे. त्यामुळे थंडीची तीव्रता वाढलीय. ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात घट नाेंदवली जात असून गारवा वाढलेला दिसताेय. याचा परिणाम पिकांवर हाेणार असल्याचे हवामान अभ्यासकांचे म्हणणे आहे. थंडीच्या लाटेची परिस्थिती ही पुढील दाेन-चार दिवस राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे सांगण्यात आले.
थंडीची लाट कशामुळे?
अफगाणिस्तानातून सतत पश्चिम चक्रावाताचे आगमन होत आहे. अरबी समुद्राकडून बाष्पाचा पुरवठा होत आहे. त्यामुळे उत्तर भारतात बर्फवृष्टी होतेय. दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड, राजस्थानाकडून थंड वारे वाहत आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातही थंडीची लाट आल्याचे दिसते. यामुळे गहू, हरभरा, द्राक्ष आणि काढणीला आलेल्या लाल कांद्याचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. साधारणतः आणखी काही दिवस हा कडाका राहण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्वच शहरातील कमाल तापमानात घसरण नाेंदवली गेली आहे.
from https://ift.tt/3KaBnMw