
दीपक करंजुले
पारनेर : विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा तिसरा टप्पा घोषित करण्यात आला असून त्यात राज्यातील विविध कार्यकारी सेवा संस्थांचा समावेश आहे.त्या नुसार पारनेर तालुक्यातील गावोगावच्या शेती व शेतकऱ्यांच्या आर्थिक नाड्या सांभाळणाऱ्या ९७ सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल होत्या. या अनुषंगाने न्यायालयाने कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घेण्यापूर्वी राज्यातील निवडणुकीस पात्र सर्व कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या निवडणुका तातडीने घ्याव्यात असे आदेश १८नोव्हेंबर २०२१ रोजी दिले. त्यानुसार आता प्राधिकरणाने निवडणुकीस पात्र कृषी उत्पन्न बाजार समित्यांची सुरु केलेली निवडणूक प्रक्रिया रद्द केली असून तिसऱ्या टप्प्यात सहकारी संस्थांची निवडणूक प्रकिया घोषित केली आहे.
निवडणुकांसाठी गावागावात राजकीय नेते, सहकारातील मंडळी बाशिंग बांधुन तयार आहेत.या सेवा संस्था जिल्हा बॅंकेच्या अंतर्गत कार्यरत असतात. सहकारी संस्था व चळवळीतील पाया म्हणून या सोसायट्यांना महत्व दिले जाते. ग्रामपंचायतीपेक्षाही शेतकऱ्यांना पीककर्ज, शेतीसाठी लागणारे विविध प्रकारचे कर्ज या संस्थांच्या माध्यंमातून वितरीत केले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना या सेवा संस्था व त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क ठेवावाच लागतो.
पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत नवीन सेवा संस्थांच्या सदस्यांचे मतदान असून गावोगावच्या संस्था आपल्याच समर्थकांच्या ताब्यात राहाव्यात म्हणून राष्ट्रवादी, शिवसेना,भाजप हे तिन्ही पक्षाचे नेतेमंडळी लक्ष घालणार आहेत त्यामुळे गावोगावी राजकारणाचा धुरळा उडणार आहे.
from https://ift.tt/3p3KAMU