
देविदास आबूज
पारनेर : इंग्लंड सारख्या देशात ग्रामीण भागातील मराठी महिलेनं ब्युटी पार्लर उभारणं हे कौतुकास्पद तर आहेच, पण त्यापेक्षाही जास्त ते आव्हानात्मक आहे. तिथली भाषा शिकणे, तेथील महिलांना ब्युटी ट्रीटमेंट्स आवडणे, सुरुवातीला अनुभवासाठी घरातच पार्लर केले. त्यात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. अशा प्रचंड मेहनतीनंतर अनोळखी देशात स्वत:च्या हिंमतीवर पार्लर उभे केलं. आता अनिता राज देवकर यांचे मिल्टन किन्स (लंडनपासून ८० किमी अंतर) शहरात या चार ब्युटी सेंटर आहेत. एका छोट्याशा जागेत सुरू केलेला अनिता यांचा प्रवास एका ‘सुंदर’ वळणावर येऊन ठेपला आहे.
एखादा लहान समारंभ असो, वा मोठ्या पार्ट्या… आजकाल सर्वच कार्यक्रमांसाठी ‘ब्युटिशियन’ची हमखास वेळ घेतली जाते. या क्षेत्रातील तज्ज्ञांची मागणी दिवसागणिक वाढत आहे. म्हणून मोठ्या संख्येनं मुलं या क्षेत्राकडे वळत आहेत. मूळच्या पारनेर तालुक्यातील सारोळा अडवाई येथील असलेल्या अनिता यांचे नगर हे सासर. त्यांनी ‘ब्युटिशियन’ होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं. त्यांची ही स्वप्नपूर्ती झाली २००३ मध्ये इंग्लंडमधील मिल्टन किन्स या शहरात. तेथे त्या “अनिताज् ब्युटी सेंटर’ या नावाने पार्लर चालवतात. ब्युटी सेंटर असणाऱ्या त्या पहिल्या मराठी महिला आहेत. अनिता यांनी सुरुवातीला घरातच ब्युटी सेंटर सुरू केले होते. त्यांच्याकडे मराठी महिला ब्युटी ट्रिटमेंट्स घेण्यासाठी यायच्या. परिसरात त्यांची ओळख झाल्याने त्यांच्याकडे महिलांची संख्या वाढली. नंतर त्यांनी कारपार्किंगच्या जागेत ब्युटी सेंटर सुरू केले. मात्र तेथे आलेल्या अडचणीमुळे त्यांनी नंतर २०११ मध्ये मिल्टन किन्स शहरातच बाजारपेठेत पहिले ब्युटी सेंटर सुरू केले. तेथे त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. इंग्लिश महिला मोठ्या प्रमाणात त्यांच्या ब्युटी सेंटरला येऊ लागल्या. त्यांना या अडीच लाख लोकसंख्या असलेल्या शहराच्या विविध भागातून महिला त्यांच्याकडे येत होत्या. महिला ग्राहकांचा वाढता ओघ. यामुळे त्यांनी २०१३ मध्ये दुसरी, २०१८ मध्ये तिसरी, आणि२०२० मध्ये “अनिताज् ब्युटी सेंटर’ची चौथी शाखा सुरू केली. त्यांच्या सेंटरमध्ये जवळपास दोन डझन कर्मचारी काम करतात. यासाठी अनिता यांना त्यांचे पती राज देवकर यांचे मोठे सहकार्य मिळते. त्यामुळे एका छोट्याशा खेडेगावातून इंग्लंडमध्ये ब्युटी सेंटरच्या शाखा सुरू करण्याचा अनिता यांचा इथपर्यंतचा प्रवास वाटतो तेवढा नक्कीच सोप्पा नाही.
लग्न झाल्यावर त्यांचं सासर होतं नगरला. त्यांनी ब्युटीपार्लरचा काेर्स केलेला होता. त्यांचे पती राज देवकर हे इंग्लंडमध्ये एका कंपनीत नोकरीला होते. त्यांच्यासोबत अनिताही इंग्लंडला गेल्या. त्यांनी तेथे घरातच ब्युटी सेंटर सुरू केले होते. मात्र महिलांचा वाढता ओघ पाहून त्यांना राज देवकर यांनी पाठिंबा दिला. ‘तू कार पार्किंगमध्ये ब्युटी सेंटर सुरू कर प्रतिसाद मिळेल, अशा शब्दांत त्यांनी विश्वास दिला. पुढे अनिता यांनी चार पाच वर्षे ब्युटी सेंटर व्यवस्थित चालवले. या दरम्यान ब्युटी सेंटर सुरू करण्यासाठी त्यांना कोणीतरी बाजारपेठेत भाड्याची जागा सुचवली. अनिता यांनी त्यासाठी होकार दिला. नंतर पती राज यांच्या मदतीनं मिल्टन किन्स शहरात एका मराठी महिलेचं ब्युटी सेंटर उभे राहिलं. त्याच्या उद्घाटनाला आल्या होत्या त्या शहराच्या महापौर. पती, कुटुंबीयांचा पाठिंबा आणि प्रचंड आत्मविश्वास, मेहनत या जोरावर अिनता यांनी इंग्लंडमध्ये ब्युटी सेंटरच्या व्यवसायात मोठी झेप घेतली आहे. अनेकींचं सौंदर्य त्यांनी खुलवलं आहे.
शेजाऱ्यांची तक्रार ठरली ‘टर्निंग पॉईंट’
सुरुवातीच्या काळात अनिता यांनी घराबाहेर असलेल्या कार पार्किंगच्या जागेत ब्युटी सेंटर सुरू केले होते. त्यांच्या सेंटरमध्ये मोठ्या संख्येने महिला ब्युटी ट्रिटमेंट्स घेण्यासाठी यायच्या. त्या महिला त्यांच्या कार रस्त्यावर उभ्या करायच्या. त्यामुळे अिनता यांच्या शेजाऱ्यांनी तेथील पालिकेकडे तक्रार केली. त्यानंतर अनिता यांनी भाड्याची जागा घेत २०११ मध्ये ब्युटी सेंटर सुरू केले. तेथे त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर अवघ्या नऊ वर्षांत त्यांनी ब्युटी सेंटरच्या चार शाखा सुरू केल्या. त्यामुळे शेजाऱ्यांची तक्रार ही माझ्या व्यवसायाला ‘टर्निंग पॉईंट’ ठरल्याचे अनिता सांगतात.
मिल्टन किन्स शहरात चार शाखा असलेली एकमेव संस्था
मिल्टन किन्स शहरात “अनिताज् ब्युटी सेंटर’च्या चार शाखा आहेत. या शहरात एका संस्थेच्या चार शाखा आहेत, अशी ही एकमेव संस्था आहे. या शहरातील हे नंबर एकचे ब्युटी सेंटर आहे. तसेच या ब्युटी सेंटरला ग्राहक सेवा वर्गवारीत (कस्टमर सर्व्हिस कॅटेगरी) या तीन वेळा राष्ट्रीय पारितोषिक मिळाले आहे.
मनावर घेतले मराठी माणूसही भरारी घेऊ शकतो
पारनेर तालुक्यातील सारोळा अडवाई या एका छोट्याशा गावातील मुलगी इंग्लडमध्ये येऊन ब्युटी सेंटर सुरू करते. आज ती इंग्लंडमधील सर्वाेत्तम ब्युटी सेंटर चालक आहे. मनावर घेतले,तर माणूसही भरारी घेऊ शकतो. ते अनिता यांनी दाखवून दिले आहे. मराठी माणूस नोकरीच करू शकतो, व्यवसाय नाही. मात्र आत्मविश्वास, जिद्द अनिता ठरवले, तर आपणही पुढे जाऊ शकतो, हे अनिता यांच्या व्यवसायावरुन सिद्ध होते, अशी प्रतिक्रिया अनिता यांचे पती राज देवकर यांनी दिली.
आमच्या गावच्या कन्येच्या नावाचा डंका आज सातासमुद्रापार वाजत आहे. याचा आम्हा गावकऱ्यांना सार्थ अभिमान आहे. अनिताच्या आदर्शावर पाऊल ठेवत गावातील इतर कन्यांनीही गावाचे नावलौकिक उज्ज्वल करावे
परशूराम फंड
सरपंच, सारोळा अडवाई
from https://ift.tt/3GShnvQ