पंतप्रधान मोदींचा 10 कोटी शेतकऱ्यांना थेट ‘मेसेज’ !

Table of Contents

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने शेतकरी वर्गाला एक संदेश पाठवण्यात आला आहे. नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत डिसेंबर 2021 ते मार्च 2022 या कालावधीसाठीचे 2 हजार रुपये आपल्या खात्यात आलेच असतील. या पैशांमुळे शेतीच्या कामातील काही गरजा पूर्ण होऊ शकतील.
सुमारे 10 कोटी शेतकऱ्यांना हे मेसेज आले असून त्यात शेतीबाबत एक महत्त्वाचा संदेश देण्यात आला आहे. शेतीसाठी पाठवण्यात आलेले पैसे शेतीसाठी वापरण्यासोबतच पिकांच्या पद्धतीतही सरकार आमुलाग्र बदल करू पाहत असल्याचा संदेश यातून मिळत आहे.पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याच्या खात्यात दोन-दोन हजार रुपये जमा केल्यानंतर शेतकऱ्यांना सरकारच्या वतीने एक संदेश पाठवण्यात आला आहे.
ज्यांना पैसे मिळाले नाहीत, त्यांना पुढील एक-दोन दिवसांत ते मिळतील, असेही या संदेशात सांगण्यात आले आहे. ज्यांचे आधार व्हेरिफिकेशन झालेले नाही, त्यांना मात्र पैशांसाठी जास्त काळ वाट पाहावी लागणार आहे. रासायनिक शेतीऐवजी अधिकाधिक शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे, यासाठीदेखील सरकारचा प्रयत्न सुरू असल्याचे यातून अधोरेखित होत आहे. जीवामृत आणि घनजीवामृत ही दोन प्रकारची जैविक खतं कशी तयार करावीत, यामुळे बियाण्यांवर आणि किटकनाशकांवर होणारा शेतकऱ्यांचा खर्च कमी व्हावा आणि अधिक लाभ शेतकऱ्यांना व्हावा, हा सरकारचा उद्देश असल्याचं सांगितले जात आहे.
देशातील एकूण शेतकऱ्यांपैकी साधारण 86 टक्के शेतकरी हे अल्प भूधारक आहेत. त्यांच्यासाठी वार्षिक 6 हजार रुपयांची मदत ही शेतीच्या अनेक कामांसाठी मदत करणारी ठरणार आहे.शेतकऱ्यांच्या खात्यात जे पैसे सरकारच्या वतीने ट्रान्सफर केले जातात, त्याचा योग्य विनियोग व्हावा आणि ते शेतीच्या कामांसाठीच वापरले जावेत, हा यामागचा सरकारचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. पुढील काही दिवसांत पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड यासारख्या कृषीप्रधान राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 1 जानेवारीच्या दिवशी 10.09 कोटी लाभधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 20,900 कोटी रुपये ट्रान्सफर केले आहेत. त्यानंतर दोनच दिवसांत पंतप्रधानांचा संदेश शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला आहे.

from https://ift.tt/3eQD2bo

Leave a Comment

error: Content is protected !!