
पारनेर : प्रतिनिधी
कोरोना काळात नागरिकांना मदतीचा हात देत कामाच्या माध्यमातून आमदार नीलेश लंके यांनी पारनेर तालुक्याचे, जिल्हयाचे तसेच महाराष्ट्राचे नाव देशात मोठे केल्याचे गौरवोद्गार आमदार नीलेश लंके यांनी काढले.
आमदार नीलेश लंके यांच्या वाढदिवसनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस तसेच नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या वतीने हंगे येथे गुरूवारी सर्वधर्मीय सामुदायीक विवाहाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळयास उपस्थित राहून पवार यांनी वधूवरांना आशिर्वाद दिले. यावेळी हंगे येथील १९ कोटी रूपयांच्या विकास कामांचा शुभारंभही पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्रीताई घुले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेेशाध्यक्ष मेहेबूब शेख आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पवार म्हणाले, आ. लंके यांच्या वाढदिवसानिमित्त विविध धर्मीयांचे विवाह आयोजित करून आ. लंके यांनी सर्वधर्म समभावाची जपवणूक केली आहे. दोन वर्षांपूर्वी कोरोनाचे संकट आले. लोकांमध्ये अस्वस्थता होती. लोकांची रोजी रोटी बुडाली. हजारो लोक मृत्यूमुखी पडले. अशा वेळी पारनेरचा आमदार घरी बसला नाही. रूग्णांच्या उपचाराची व्यवस्था केली. स्वतःचा पगार त्यासाठी खर्च केला. लोकांनी दिलेल्या मदतीचेही योग्य नियोजन केले. कोरोनाच्या संकटात हा माणूस घरीही गेला नाही. मी राज्यात फिरतो त्यावेळी लोक मला सांगतात की आमदार लंंके यांना आमच्याकडे पाठवा. संकटकाळात लोकांच्या मागे खंबीरपणे उभा राहणारा आमचा पारनेरचा सहकारी राज्याला परिचित झाला आहे.
वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विवाह सोहळयाला उपस्थित राहण्याचा निर्णय मी घेतला. कारण नीलेशचा कार्यक्रम चुकवायचा नाही हा आमचा निर्णय झाल्याचेही पवार म्हणाले.
पारनेरकरांसाठी आजचा दिवस भाग्याचा असल्याचे सांगत यावेळी बोलताना आ. नीलेश लंके म्हणाले, कोराना काळात लोक हतबल झाले होते. वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी काम करु असा निर्णय कार्यकर्त्यांच्या बैठकीत झाला. लोकांची आर्थिक स्थिती नाजूक झाल्याने सर्वधर्मीय सामुदायीक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी ८०० विद्यार्थ्यांना सायकल वितरण करण्यात आल्याचे लंके यांनी सांगितले. या सोहळयासाठी पवार साहेबांची उपस्थिती आहे हा भाग्याचा दिवस आले. पवार साहेबांनी माइयासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदारकीची संधी दिली. कोरोना काळातही पवार साहेबांच्या आशिर्वादामुळे मतदारसंघात तब्बल ५०० कोटी रूपयांचा निधी मिळाला. पवार यांचे हे ॠण आम्ही विसरणार नाही असेही आ. लंके म्हणाले.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा मंजुषाताई गुंड,बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, पंचायत समितीच्या उपसभापती सुनंदा धुरपते, नगराध्यक्ष विजय औटी, उपनगराध्यक्षा सुरेखाताई भालेकर, मधुकर उचाळे,शिवाजी बेलकर,अशोक सावंत, संदिप वर्पे,बाबाजी तरटे,सुदाम पवार, अशोक कटारिया, अॅड. राहूल झावरे, संदीप चौधरी, जितेश सरडे, विक्रम कळमकर,सुवर्णाताई धाडगे, पुनम मुंगसे,अशोक (बबलू) रोहोकले, बापू शिर्के, अशोक घुले, प्रदीप खिलारी, सचिन पठारे, कारभारी पोटघन, भाऊसाहेब भोंगाडे, सरपंच बाळासाहेब दळवी, राजू शिंदे, दादा शिंदे,आदी.यावेळी उपस्थित होते. सुत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले.
पवारांचे शाही स्वागत
शरद पवार यांचे हंगे गावात आगमन झाल्यानंतर कार्यक्रमस्थळी त्यांचे शाही स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या शपथविधीसाठी असलेला तुतारी वादकांचा ताफा खास मुंबईवरून बोलविण्यात आला होता. आमदार नीलेश लंके यांनी पवार यांचा चांदीची गदा तसेच मराठमोठा फेटा बांधून स्वागत केले.
टीम हंगा चे चोख नियोजन
हंगे गावातील आ. लंके यांच्या सहकाऱ्यांनी विविध कामांचे चोख नियोजन करून वेगळेपण सिध्द केले. ज्या कार्यकर्त्याकडे जी जबादारी सोपविण्यात आली ती त्यांनी चोखपणे बजावली. त्यामुळेच मोठा जनसमुदाय उपस्थित असतानाही हा सोहळा अतिशय नेटकेपणाने पार पडला.
प्रत्येक वाढदिवसाला स्वप्न पूर्ण !
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मेहेबूब शेख म्हणाले, आ. लंके हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाल्यापासून मी त्यांच्या वाढदिवसाला उपस्थित राहत आहे. पहिल्या वाढदिवसाला विधानसभेची प्रतिमा असलेला त्यांचा केक होता. ते विधानसभेत पोहोचले. आज लाल दिव्याची गाडी असलेला केक आहे, त्यांचे हे स्वप्नही पूर्ण होईल असा विश्वास शेख यांनी व्यक्त केला.
लंके यांना संधी द्या
माजी आमदार दादाभाऊ कळमकर म्हणाले, आ. लंके याचे काम संपूर्ण जगाने पाहिलं आहे. आता त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली पाहिजे अशी विनंती माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांनी शरद पवार यांच्याकडे केली.
महाराष्ट्रातील तरुणाई हंग्यात लोटली !
आ. लंके यांचा संपूर्ण राज्यात आहे. आ. लंके प्रतिष्ठाणच्या आवाहनानंतर पुणे, नाशिक, बीड, औरंगाबाद, सातारा, सांगली, ठाणे, रायगड आदी जिल्ह्यातील तरुणाई हंग्यात लोटली होती.
from https://ift.tt/Y7248xZ