
शिरूर : ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात नथूरामची भूमिका साकारणारे शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. पक्षातील नेत्यांकडूनच त्यांना घरचा आहेर मिळत असून दुसरीकडे सोशल मीडियावरही नेटकऱ्यांकडून ते चांगलेच ट्रोल झाले आहेत.
नथुराम हा महाराष्ट्राला लागलेला काळा डाग आहे. हा डाग उभ्या आयुष्यात पुसताचं येणार नाही. तो डाग गडद होताच कामा नये, अशी भूमिका मांडत राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी विरोध दर्शवला आहे. डॉ. अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका केलेली आहे. त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली, तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलेच आहे. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही” अशी भूमिका आव्हाड यांनी मांडली आहे.
आपण जसे अभिनेते आहेत तसे एक जबाबदार नेते सुद्धा आहात त्यामुळे आपली सार्वजनिक जीवनातील जबाबदारी व वैचारिक भूमिका खूप महत्त्वाची आहे. आपण महात्मा गांधीजींना निःशंकपणे राष्ट्रपिता मानता की नाही ? याचे जगजाहीर स्पष्टीकरण द्यावे असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी म्हटले आहे.
“अमोल कोल्हे यांनी कोणती भूमिका स्वीकारावी हा त्यांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा भाग आहे. अर्थात ते सार्वजनिक जीवनात असल्यामुळे त्यांच्या कृतीसंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करण्याचे तेवढेच स्वातंत्र्य इतरांनाही आहे, ते कुणी नाकारण्याचे कारण नाही.” असे एका नेटक-याने म्हटले आहे. तर
कलाकार म्हणुन त्यांनी कुठलीही भुमिका केली तरी त्यामुळे वैयक्तिक पातळीवर टिका होणं हे योग्य नाही.पण मुळातच एखाद्या भुमिकेमुळे राजकीय फायदा उठवल्यामुळे आता ते पचवायला जड जातंय एवढंच बाकी काही नाही. असे दुसऱ्या नेटक-याने म्हटले आहे.
”कोल्हेंनी नथुरामाची भूमिका करणं हा त्यांच्या व्यक्तीगत म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. पण नथुरामाचा राज्यघटनेवर विश्वास नव्हता, मग इकडे नथुरामाची भूमिका जगायची आणि तिकडे त्याला मान्य नसलेल्या राज्यघटनेप्रमाणे खासदार रहायचं हा संघर्ष मनातल्या मनात होऊ नये म्हणून खासदारकीचा राजीनामा देणं योग्य ठरेल. मला खात्रीच आहे की ही नैतिक द्विधा त्यांना मनातून त्रास देत राहील,” असे विश्वंभर चौधरी म्हणाले. कोल्हेंनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, असे चौधरी यांनी सांगितले.
from https://ift.tt/3AhQ1gk