
सातारा : पश्चिम महाराष्ट्रातील दोन महत्वाच्या जिल्हा बँकांच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे जाणार, याकडे सगळयांचे लक्ष लागून होते. अशातच साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला आहे.
शिंदेंविरोधात उभे असलेले राष्ट्रवादीचे बंडखोर ज्ञानदेव रांजणे यांचा विजय झाला आहे. शशिकांत शिंदे यांना 24 मतं मिळाली असून विजयी उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांना 25 मतं मिळाली आहेत. शशिकांत शिंदे यांचा पराभव हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का समजला जात आहे. दरम्यान, सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 21 पैकी 11 जागा बिनविरोध निवडून आल्या तर 10 जागांवर झालेल्या मतदानाची मोजणी आज पार पडली. या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीचं पॅनल होते. तर महाविकास आघाडीतील पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकलेत.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत 96 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. 21 जागांसाठी ही लढत असताना यातील 11 जागा या बिनविरोध झाल्या होत्या. मात्र उर्वरीत दहा जागांसाठी झालेल्या मतदानावेळी अनेक मतदान केंद्रावर हायहोल्टेज ड्रामा पहायला मिळाला. यात माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्या होम पिचवरच त्यांच्या विरोधात त्यांचाच कार्यकर्ते असलेले ज्ञानेश्वर रांजणे हे निवडणूकीच्या रिंगणात उभे होते. या दोघांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाल्याने तणाव निर्माण झाला होता. तसेच या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा पराभव होणार, अशा चर्चाही रंगल्याचे पाहायला मिळाले होते.
from https://ift.tt/3cEGzsi